मातोंड सातेरी देवस्थानचा आज लोटांगणोत्सव..!

Edited by: दिपेश परब
Published on: November 26, 2023 17:32 PM
views 174  views

- स्वप्निल परब, मातोंड

आख्यायिका भरपूर सांगितल्या जातात. पण रवळनाथाला कोकणात प्रामुख्याने प्रतिष्ठापित करण्यास द्रवीड लोकांचा पुढाकार होता, असे म्हणतात. आणि ते पराक्रमी होते. ‘तरंग’ संस्कृती त्यांनीच आणली. आणि त्याचेच द्योतक म्हणून आज प्रत्येक ग्रामदेवतेच्या ठिकाणी तरंग ही देवस्कीची भाषा ठरली. राज्यात जसे प्रधान मंडळ, तसाच काहीसा प्रकार येथे रूजू झाला. रवळनाथाचा पूर्वस मेळा (प्रधान), आणि इतर देवता या सेनापती या सदरात मोडल्या. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की, रवळनाथ प्रतिष्ठापित होण्याआधी वारूळ रूपी सातेरी माता प्रकट झाल्या. कारण आजही कोकणात रवळनाथ हा सातेरीचा पती मानतात. क्षेत्रपाळी संबंध. प्रथमत: शांतादुर्गा आणि त्याचा अपभ्रंश सातेरी. म्हणूनच तर तरंग देवता, संचारल्यावर प्रथमत: रवळनाथाला बाहेर जावून स्मरण करतात. कारण तो क्षेत्रपती आहे. मातोंडची सातेरी माता, जेव्हा प्रकट झाली, (अर्थात ती वारूळ स्वरूपात पूजनीय ठरली) तो काळ, शूरवीरांचा असावा. छत्रपती शिवाजी महाराज, वेंगुर्लेच्या दिशेने कूच करताना या भागातून गेल्याचा उल्लेख आहे. आणि विशेषत: ज्या शक्ती देवता स्वयंभू आहेत, त्यांची रचना कुलदेवतेच्या, ग्रामदेवतेच्या स्वरूपात नंतर स्थीरावली. महाकाली, चंडरूपी, रणरागिणी, उदात्त, संवादी बनवणारी ही देवता. मातोंड गावाच्या शिरपेचात जणू एक मानाचा तुरा! वारूळ...सात कप्प्यांचे म्हणून सातेरी हे ज्येष्ठ विचारवंत राजेंद्र केरकर यांचे म्हणणे योग्य असले तरी ही शक्तीदेवतेचे प्रकटीकरण हे उपासना आणि भक्तीचा एक प्रताप म्हणावा लागेल. या महन्मंगल, करूणारूपी सातेरीची आज वार्षिक जत्रा!

शक्तीच्या उपासनेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. ती दुर्गा, काली, गौरी, महिषासुरमर्दिनी नावं अनेक पण रूप एकच. कोकणात बहुतांशंी स्वयंभू सातेरीची देवस्थाने ही वारूळ स्वरूपात आहे. आणि या वारूळालाही एक वेगळा इतिहास आहे. कुषाण राजांच्या नाण्यांवरही देवींचे अंकन आहे. ग्रीक राजांच्या नाण्यांवरही स्त्रीशक्ती देवता आहे. त्यामुळे या शक्तीपूजेचे स्वरूप व्यापक आहे. स्वयंभू सातेरीचे स्वरूप वारूळातच का? देवीच्या प्रकोपानंतर ज्या ज्या स्थितीत देवींनी स्वत:ला स्थानबद्ध केले, ते स्थान एकतर शिळा होते, अन्यथा वारूळ. वारूळ मुंग्या बनवतात, असे म्हणतात. पण जिथं पाण्याचा स्त्रोत आहे, तिथं वारूळाची निर्मिती जास्त आहे. या वारूळांना ११ व्या १२ व्या शतकापासूनच एक दैवी अधिष्ठान प्राप्त झाल्याचे म्हटले. पाण्याचा स्त्रोत टिकून रहावा, शेतीवाडीचं रक्षण व्हावं, म्हणून भाविकांनी वारूळांसमोर हात जोडले. इथं ती शक्ती अस्तित्वात आली, जी महिषासूरमर्दिनीच्या अवतारात दिसते. ‘सप्तइरी’ हा मूळ शब्द. त्यापासून सातेरी. वारूळाला आतमध्ये सात कप्पे असतात, म्हणून सातेरी. कोंकणातील देवस्थानांचा अभ्यास हा स्त्री भोवतीच फिरतो. कोकण हा केरळप्रमाणेच द्रवीड संस्कृतीचा मातृसत्ताक कुणबी भाग. कोकणातील प्रमुख राज्यकर्ती स्त्रीच होती. त्यांची देवता भावई. यावरून कोंकण स्त्री सत्ताक होते, हे सिद्ध होते.

सातेरी सर्वसामान्य जनतेला जवळची वाटणारी देवी. गावाचे रक्षण करणारी ग्रामदेवी. सद्गुरु स्वामी समर्थांनीही प्रगट होताना या वारूळाचाच आधार घेतला. म्हणजे, यावरून वारूळाची महती लक्षात येईल. शिव अस्तित्वाचे क्षेत्र म्हणूनही त्याची ख्याती आहे. आणि जिथं शिव, तिथे शक्ती आलीच.

गेल्या कित्येक दशकांपासून मातोंडमधील सातेरीचा महिमा भक्तांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. स्वयंभू देवस्थान, अन् त्यानंतर निर्माण करण्यात आलेली गावर्‍हाटीची संकल्पना यातून एक परिपूर्ण असं धार्मिक स्थळ हे बनलं आहे. भक्त अनेक अनुभव घेतात, पण या अनुभवातून भक्तीची पेरणी होताना, श्रद्धेचं बीज अलगद उगवतं. सर्व दु:ख, अपराधांचे क्षमाशालन जिथं होते, तिथं ग्रामदेवतेच्या अस्तित्वाची खरी परीक्षा असते. देवी फक्त भक्तीची भुकेलेली असते. तिला अन्य कशाही झगमगाटाची गरज नसते. कारण सात्विक रूपात तिची शक्ती भक्तांच्या भक्तीवर अवलंबून असते. मातोंड ग्रामस्थ आणि समस्त गांवकर मंडळी यांच्या अथक प्रयत्नांतून गेली अनेक वर्षे हा सोहळा सुरू आहे. जागृत म्हणण्यापेक्षा स्वयंभू अधिष्ठान असलेलं हे देवस्थान. पुन्हा एकदा त्या माऊली चरणी शतश: नमन!!