कोलगावच्या अरुंधती चव्हाणनं 'मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी'मध्ये प्राप्त केली न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीची पदवी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2023 18:33 PM
views 190  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग कन्या आणि सावंतवाडी कोलगाव येथील रहिवाशी अरुंधती रविकिशोर चव्हाण हीन न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी येथून मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी या पदव्युत्तर कोर्स मध्ये उज्वल यश संपादन करत उत्तीर्ण झाली आहे. १८ मे २३ रोजी हा पदवीदान सभारंभ न्यूयॉर्क येथे पार पडला.

अरुंधतीने आपले संपूर्ण परदेशी शिक्षण हे महाराष्ट्र शासनाची शासकीय शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केले. पालकांवर कुठलाही आर्थिक बोजा येवू दिला नाही. तिने महाराष्ट्र सरकार पुरस्कृत परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून विद्यार्थ्यांनी ह्या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यायला हवा असे आवाहन तिने केले आहे. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळेच परदेशी अमेरिकेत शिक्षण पूर्ण करू शकले असेही तिने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. जर तुमच्याकडे मेरिट असेल तर महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे ही धारणा मनात पक्की करावी असेही ती म्हणाली.

अरुंधतीने मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडीची विद्यार्थिनी असून तिथे पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पालकांची म्हणजे आई आणि वडिलांची बदली पुणे येथे झाल्याने तिने न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे हायस्कूल शिक्षण घेतले व उच्च माध्यमिक शिक्षण एसपी कॉलेज पुणे येथून पूर्ण केले.बारावी नंतर तिने बायोटेक्नॉलॉजी हा विषय घेवून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पुणे इथून बीटेक पदवी प्राप्त केली.तिला बालपणापासून जीवशास्त्र ह्या विषयात रुची असल्याने तिने हा विषय निवडून उच्च शिक्षण प्राप्त केले असून तिच्या ज्ञानाचा आपल्या देशाला फायदा कसा होईल याकडे तिचे विशेष लक्ष असणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जग कोविडग्रस्त असतानाही तिने परदेशी शिक्षणासाठी अमेरिकेत जायचा धाडसी निर्णय घेतला. प्रतिष्ठित, नामवंत आणि जगात अव्वल रँकिंग असलेली न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झाले याचा आनंद खूपच मोठा होता. अरुंधती हीचा मोठा भाऊ रोहन हा सुद्धा उच्च शिक्षित असून त्याने आयआयटी मद्रास येथून बॅचलर्स आणि मास्टर्स तर अत्यंत प्रतिष्ठित अशा युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथून मास्टर्स केले आहे. तिचे वडील अधिक्षक अभियंता तर आई लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. अरुंधतीच्या कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कामगिरी चे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.