
सिंधुदुर्ग : 21 ऑक्टोंबर 1959 रोजी लडाख मधील भारतीय सिमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा "हॉटस्प्रिंग" या ठिकाणी भारताचे 10 पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दबा धरुन बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांचेवर हल्ला केला. या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना विरगती प्राप्त झाली. या वीर जवानांनी आपल्या देशाच्या सिमेचे रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्याची गाथा इतरांना कळावी. तसेच राष्ट्र निष्ठेची व कर्तव्य निष्ठेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी, म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीपित्यर्थ 21 ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारत भर "पोलीस स्मृती दिन" म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून वर्षभरात दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना विरगती प्राप्त झाली, त्या वंदनिय वीर श्रेष्ठांना श्रध्दांजली अर्पण करणेकरीता आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे परेड मैदानावर "पोलीस स्मृती दिन" साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले."पोलीस स्मृती दिन" परेड मैदानावर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
जिल्हाधिकारी यांनी प्रास्ताविकामध्ये शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करुन त्यांना आदरांजली वाहीली. त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री. रामदास पालशेतकर यांचे नेतृत्वाखाली असलेल्या प्लाटूनने शोक सलामीव्दारे मानवंदना दिली. सदरवेळी वर्षभरात दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना विरगती प्राप्त झाली अशा वीरांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर सदर प्लाटूनने हवेत तीन वेळा गोळीबार करुन मानवंदना दिली. शहीद जवानांना मानवंदना दिल्यानंतर मा. जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे व पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी शहीद पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहीली. "पोलीस स्मृती दिन" परेडकरीता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच मुख्यालयाचे बँड पथक उपस्थित होते.