विवाहित महिला भाजून जखमी ; बबन साळगावकरांची चौकशीची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2024 10:44 AM
views 425  views

सावंतवाडी : विवाहित महिला जवळून भाजली असूनही घरच्या लोकांनी तिच्यावर कोणते उपचार अद्याप पर्यंत केले नसल्याने, आणि बांदा पोलिस याबाबत गुन्हा दाखल करत नसल्यामुळे, याप्रकरणी  महिलेच्या माहेरच्या लोकांनी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. श्री साळगावकर यांनी त्वरित पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेऊन या प्रकरणी संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली. पोलीस उप विभागीय अधिकारी गावडे यांनी बांदा पोलिस स्टेशनची संपर्क साधून संबंधितांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी आता सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे असे माहिती साळगावकर यांनी दिली.


काही दिवसापूर्वी बांद्याजवळील एका गावातील विवाहित महिला जळून गंभीर रित्या भाजल्याचा प्रकार घडला. मात्र तिच्या घरच्या लोकांनी गेले किती दिवस कुठल्याही आरोग्य केंद्रात किंवा खाजगी दवाखान्यात उपचार केले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी संशय निर्माण होत आहे. सदर महिलेच्या माहेरील लोकांना ही घटना कित्येक दिवस कळवली नव्हती. शेजाऱ्यांकडून आपली मुलगी जळाली आहे हे समजल्या नंतर विवाहित महिलेच्या माहेरच्या लोकांनी बांदा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार केली. मात्र संबंधित जळीत महिला तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी केस दाखल करण्यात नकार दिला. अखेर संबंधित विवाहिता जळीत प्रकरणातील नातेवाईकांनी श्री. साळगावकर यांची यांच्या गुरुकुल कार्यालयामध्ये भेट घेतली. 


जळीत महिलेची आई, तीच्या दोन बहिणी, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे यांचा समवेत साळगावकर यांनी पोलीस अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. डी वाय एस पी संध्या गावडे यांनी संबंधित विवाहित महिलेच्या पतीला काल शुक्रवारी बांदा पोलीस ठाण्याला आणून चौकशी केली आहे. जळीत महिलेवरती दबाव असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवरती कारवाई होणं आवश्यक आहे. संबंधित जळीत विवाहिता ही गोवा राज्यातील आहे. म्हणून न्याय मिळाला नाही असे होऊ नये. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून न्याय देणे गरजेचे आहे असे साळगावकर म्हणाले. महिला जळाल्यानंतर माहेरच्यांना त्याची माहिती संबंधित पतीकडून देण्यात का आली नाही? जळीत प्रकरणाची महिलेला वैद्यकीय उपचार का मिळू दिले नाहीत? घरीच उपचार करण्यामागचा हेतू काय होता? महिलेला घरी डांबून का ठेवण्यात आले? दोन दिवसांपूर्वी माहिती मिळाल्यानंतर महिलेचे नातेवाईक गोवा येथे महिलेला उपचारासाठी प्रयत्न करत होते तेथेही त्यांना पाठवण्यात मज्जाव करण्यात आला. महिलेचा पती ओरोस येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर हुज्जत घालत होता. त्याची सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी साळगावकर यांनी पोलिसांकडे केली आहे.