
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजार समिती स्थापन होऊन २५ वर्षे झाली मात्र मुख्य मार्केट यार्ड नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादित माळा विक्री करण्यासाठी जागा नव्हती.त्यासाठी बाजार समितीने नांदगाव येथे जागा घेतली आहे.पहिल्या टप्प्यातील इमारत बांधकामाचा शुभारंभ ११ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. नारायण राणे, पणण मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तर पालकमंत्री ना. नितेश राणे, सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष दिपक केसरकर, आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.अशी माहीती कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती तुळशिदास रावराणे यांनी दिली. यावेळी संचालक मकरंद जोशी, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.
पुढे रावराणे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डसाठी जमिन खरेदी करण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे, बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेने कर्ज दिले. खरेदीखत झाल्यानंतर संचालक मंडळाने मंत्री नितेश राणे यांची भेट घेवून इमारत बांधकाम, सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली. त्यानुसार मंत्री राणे यांनी मार्केट यार्ड अत्याधुनिक इमारत बांधण्यासाठी अंदाजपत्रक बांधकामासाठी सुचना केली. आमच्या बाजार समितीने आर्किटेक्ट योगेश सावंत यांची निवड केली. मार्केट यार्डसाठी आवश्यक असलेल्या इमारतींसाठी अंदाजपत्रक ६६ कोटी रुपये झाले असून त्याची मंजुरी पणन संचालक पुणे यांच्याकडून घेण्यात आली आहे. सिंधुरत्न , चांदा ते बांदा या योजनेतून अध्यक्ष दीपक केसरकर यांना निधी देण्याची सुचना खा. नारायण राणे , पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली. त्यानुसार ६ इमारती अत्यावश्यक असल्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आली. त्याची ५ कोटी ६६ लाखांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचे भूमिपूजन ११ एप्रिलला होणार आहे. बाजार समितीने १२.५ एकर जमीन घेतली आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याने ही जमीन कर्ज घेऊन घेवून खरेदी करण्यात आली. त्यानंतर मार्केड यार्डसाठी आवश्यक असलेल्या कार्यालयीन इमारती, गोडावून, प्रोसेसिंग युनिट, किराणा माल, फळे, काजू, आंबा, मासळी यासाठी स्वतंत्र विभाग होणार आहेत. तसेच शेतक-यांकडून घेतलेला माल ठेवण्यासाठी शितगृह उभारण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी पणण संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, बाजार समिती राज्य अध्यक्ष प्रवीकुमार माहाटा, बँक अध्यक्ष मनीष दळवी, पणन सरव्यवस्थापक विनायक कोकरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, विभागीय सहनिबंधक मिलींदराव भालेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे, सरपंच अनुजा रावराणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मार्केट यार्ड मधून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल . व्यापाऱ्यांना चांगली संधी मिळेल,रोजगार निर्मिती होईल,या दृष्टीने चांगली संधी आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विकास सर्व बंदरे आहेत,त्या ठिकाणी जागेची पाहणी करा , तसा अहवाल तयार करा. अशा सुचना केल्या आहेत. त्यानुसार मत्स्य लिलावासाठी गोव्याच्या धर्तीवर बांद्यात फिश मार्केट बनवण्यासाठी ५ एकर जागेची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.त्याठिकाणी माशांचा लिलाव होईल. राज्यातील विविध मार्केट यार्ड पेक्षा एक अत्याधुनिक इमारत सर्व सोयींनीयुक्त उभारण्यात येत आहे. या इमारतीतव्यापारी आणि शेतकरी यांच्यातील दुवा होण्यासाठी लागणाऱ्या इमारती आहेत. त्यामुळे सरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, व्यापारी, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती तुळशिदास रावराणे यांनी केले आहे.