चिपळूणात 1 किलोचा गांजासदृश पदार्थ जप्त

पोलिसांची कारवाई
Edited by: मनोज पवार
Published on: October 22, 2024 12:26 PM
views 77  views

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण पोलिसांनी धाड टाकून एका तरुणाकडून ५९ हजार किंमतीचा ९९० ग्रॅम वजनाचा गांजासदृश पदार्थ जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रोहिदास बाळू पवार (२८, पिंपळी खुर्द) असे अटक केलेल्याची तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वृषाल शेटकर (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी चार तरुणाना गांजा सेवन करताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ठिकठिकाणी धाडसत्र सुरु करून गांजा पुरवठा करणाऱ्या एका बॉडीबिल्डरसह अनेकांवर कारवाई केली होती. 

पिंपळी खुर्द येथे विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकण पथकाला मिळाली होती. त्यानुसार रोहिदास पवार याची चौकशी केली असता त्याने एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तपकिरी रंगाची पाने, फुले, काड्या असा ओलसर गांजासदृश जवळपास ९९० ग्रॅम वजनाचा पदार्थ ठेवल्याचे आढळून आले.

याप्रकरणी रोहिदास याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी दिखील चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई - पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या - मार्गदर्शनाखाली करण्यात आली.