मराठी शाळा वाचवण्यासाठी 'शिवसाम्राज्य प्रतिष्ठान'चं पुढचं पाऊल

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2025 10:31 AM
views 181  views

सावंतवाडी : एकेकाळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद असतानाच, गावागावातील मराठी शाळा पटसंख्येअभावी ओस पडत चालल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. अशा परिस्थितीत कलंबिस्त-गणेशवाडी येथील 'शिवसाम्राज्य प्रतिष्ठान'ने या बालपणीच्या शाळांमध्ये पुन्हा लगबग आणि कुजबुज ऐकू येण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रतिष्ठानने अंगणवाडी व प्राथमिक मराठी शाळेतील मुलांना दत्तक घेण्याचा संकल्प करून एक आशादायी पाऊल टाकले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने कलंबिस्त प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि गणेशवाडी अंगणवाडीतील सुमारे ५० मुलांना चित्रकलेचे ज्ञान अवगत व्हावे आणि मराठी भाषा सहज बोलता यावी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांना मराठी अंकल पट्टी, मराठी भाषेची अक्षर ओळख आणि एज्युकेशन किट भेट म्हणून देण्यात आले आहे.सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त हे माजी सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावातील दूरदृष्टी असलेल्या तरुणांनी एकत्र येत आपल्या गावच्या अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा मुले बागडावीत आणि शाळा पूर्वीप्रमाणे बहरून उठाव्यात या उदात्त हेतूने शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या झेंड्याखाली हा उपक्रम सुरू केला आहे. यंदाचे हे त्यांचे पहिलेच वर्ष आहे.


गेल्या तीन वर्षांपूर्वी कलंबिस्त-गणेशवाडी येथील तरुणांनी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानची स्थापना केली होती. आपल्या गावातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या काम करण्याचा संकल्प त्यांनी त्यावेळी केला होता. या संकल्पनेनुसार, यंदा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी गावातील मराठी बालपणीच्या शाळा आणि अंगणवाड्या विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच, प्रतिष्ठानने मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य हाती घेतले.

या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच टर्ममध्ये प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दोन्ही शाळांना भेटी देत तेथील विद्यार्थ्यांची संख्या आणि एकंदरीत परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. यानंतर, मंगळवारी २४ जून रोजी मराठी भाषा, अक्षर ओळख आणि चित्रकलेचे ज्ञान मुलांना सहजतेने मिळावे आणि मुले मोबाईलपासून दूर जाऊन चित्रांचे धडे गिरवू शकतील यासाठी पहिली ते चौथी आणि अंगणवाडीच्या मुलांना चित्रकला साहित्य भेट देण्यात आले. यावेळी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, सचिव रोहन सावंत, खजिनदार सुभाष देसाई, उपाध्यक्ष राजेश सावंत, विराज सावंत, तेजस उर्फ दीपक देसाई, ग्रामपंचायत सदस्य शेखर मेस्त्री, दशरथ नेवगी, पराग सावंत, सुहास सावंत, गुरुप्रसाद सावंत, राहुल सावंत, अमित देसाई, अंकुश मेस्त्री, विश्वजीत उर्फ विकी सावंत यांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम राबवला.

याप्रसंगी केंद्रप्रमुख गुंडू सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे, शिक्षिका सौ. श्वेता सावंत, चैत्राली राऊळ आणि अंगणवाडी सेविका सौ. सुहासिनी पवार यांच्या उपस्थितीत एज्युकेशन किटचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेडगे यांनी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे म्हटले. "यामुळे गावातील शाळा आणि विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेकडे वळतील. विशेष म्हणजे हे काम माजी विद्यार्थ्यांनी केले आहे, त्यामुळे यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "आमचे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान सामाजिक भावनेतून निर्माण झाले आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आचार आत्मसात करून आम्ही हे उपक्रम राबवत आहोत. आम्ही शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या काम करत आहोत." त्यांनी यापूर्वी होळी सणात आपल्या भागातील श्री धावगिरीश्वर देवस्थान येथे स्वच्छता अभियान आणि देवाचा जयघोष करणारे फलक लावून आध्यात्मिक सेवा केल्याचेही सांगितले. "अशीच कार्ये यापुढेही एकोप्याने करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या उपक्रमाला आमच्या वाड्यातील जुन्या जाणत्या व्यक्तींचे पाठबळ आमच्या पाठीशी आहे," असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.