
सावर्डे : चिपळूण | मनोज पवार : इंग्रजीचा बाऊ केल्याने मराठी माणसे व्यवसायात मागे पडली. शिवाजी महाराजांच्या समोर ब्रिटीश अधिकारी झुकत असत. कारण त्याकाळात महाराजांना इंग्रजी भाषा येत नसेल पण त्यांना राज्य करता येत होते, असे मत मॅप एव्हिएशन प्रा.लि.चे संस्थापक आणि उद्योजक मंदार भारदे यांनी व्यक्त केले. ते सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण आणि सहकारमहर्षी स्व.गोविंदरावजी निकम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महोत्सव कार्यक्रमात, "व्यवसाय पंथे चाला" या विषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी या सह्याद्री च्या पर्वत रांगांमधून त्या काळात कसे गढ किल्ले उभे केले असतील, असा आपण जेव्हा विचार करतो आणि आपण पायी चालताना सह्याद्रि वेगळा दिसतो, मात्र हेलिकॉप्टरने आकाशातून या पर्वतरांगाच्या वरुन ( बर्ड्स व्हू ने ) पाहताना आपल्याला हा सह्याद्री जसा दिसतो आणि आपण अंचंबित होतो, तसे मी आज तुमच्यामध्ये या कार्यक्रमास आल्यानंतर आपली सह्याद्रि संस्था पाहिली आणि मी अचंबित झालो, इतके सुंदर काम इथे उभे केलेले आहे. श्री.भारदे पुढे म्हणाले, आपली कला जोपासणे आणि निर्माण केलेल्या कलाकृतीच अथवा उत्पादन दाखवून किंमत सांगणे या पलिकडे भाषा संवाद आणि व्यवसाय काय असतो ? हे स्पष्ट करताना त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या डॉक्युमेंटरी फिल्म व्यवसायातील, एका आदिवासींचा किस्सा सांगितला की, त्या व्यक्तीकडे पासपोर्ट आणि अल्बम मध्ये इंग्लंडच्या राणीसोबत बोलतानाचे फोटो होते. तो आदिवासी एका छोट्याशा झोपडीत राहात होता, मराठी धड बोलता येत नव्हते , इंग्रजी लांबच. तो आदिवासी
एका शासकीय योजनेतून परदेशात गेला होता, कारण त्याला झाडांच्या सालापासून वेगवेगळे मुखवटे छान बनवता येत होते. ते लंडनच्या एका प्रदर्शनात मानले होते. आणि अधिकाऱ्यांनी त्याला शिकवले होते, कोणी मुखवट्याकडे पाहून विचारले, हाऊ मच? ( How Much ?) तर उत्तर द्यायचे , फाईव्ह पाऊंड! भाषा ही तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. आपल्या देशात तमीळ, कन्नड अशा विविध भाषा आहेत पण आपल्याला कुठे सगळ्याच भाषा येतात. जगाच्या पातळीवर जपान, रशिया, चायना आणि एअर बस सारखं विमान बनविणारा फ्रान्स आदी ३ /४ ( तीन चतुर्थांश) देशांमध्ये लोकांना इंग्रजी येत नाही, मग आपण का घाबरतो. आपल्या देशात विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून, तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणजे तुम्ही उपयोगाचे नाहीत.
त्यांनी व्याख्यानात इंग्रजी भाषेचा बाऊ आणि युपीएससी/ एमपीएससी परिक्षाच्या मागे असणारा मुलांचा वाढता कल या दोन विषयांवर आक्षेप ठेवला. ते म्हणाले , लाखो मुले तयारी करून स्पर्धा परीक्षांना बसतात. निकाल लागून सुमारे ३०० मुलांनाचीच निवड होते. सर्वच जण नोकरीच्या मागे धावतात. अख्खे आयुष्य तुटपुंज्या मिळकतीत बांधून घेतात.त्यामुळे नोकरीचा नाद सोडा , व्यवसायाकडे वळा. नोकरीपेक्षा व्यवसायात जोखीम आणि भीती कमी आहे. नोकरी पेक्षा व्यवसायात संधी अधिक आहेत.
त्यांनी करियर निवड करताना , 'आपल्या आयुष्याचे शेवटचे काही तास शिल्लक आहेत आणि आपल्याला आता काय करायला आवडेल? ' याचे डोळे मिटून विचार केल्यास, जे आवडेल ते आपले करियर! आणि शेवटच्या काळात कोणाला भेटायला आवडेल? तो आपला जवळचा माणूस! असे प्रात्यक्षिक करण्याचा सल्लाही दिला. मार्क- गुण हे थोड्या लोकांचे करियर असू शकेल, सर्वांचेच असू शकणार नाही.
स्वतःची काय आवड असेल तेच करा, तेच करीयर !
त्याचा ध्यास आहे का? ते करावेसे वाटते का? त्यातून जे निर्माण होईल ते सर्वोत्तम असेल.करियर निवडताना प्रतिष्ठेचे, लोक काय म्हणतील? मित्र परिवार काय करतो? हे सारे विचार बाहेर ठेवा. आजी- आजोबांचे, आई- वडिलांचे स्वप्न म्हणून करियर चा विचार करू नका? हे स्पष्ट करताना , ते म्हणाले, "स्वत:च्या डोळ्यांनी दुसर्याची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत, तर स्वतःचीच स्वप्न पूर्ण करता येतात" स्वत:चा मार्ग जो आहे त्यावरच चाला. दुसर्याचा आदर्श घेऊन त्याच्या सारखे व्हायला जाऊ नका, स्वत: सारखे बनायचा प्रयत्न करा. निवडलेल्या मार्गाचा ध्यास धरा , त्यामुळे साम्राज्य निर्माण होईल.