SPK मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: February 28, 2024 14:37 PM
views 116  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे  श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी राजभाषा गौरव दिन व वि .वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.शुभदादेवी  खेमसावंत भोंसले उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या कार्याध्यक्षा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करून आणि  वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज  यांच्या प्रतीमापूजनाने झाली.

मराठी राजभाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंती कार्यक्रमाचे औचीत्य साधून  ज्येष्ठ कवयित्री अनघा तांबोळी व संजय किल्लेदार, गायक वादक,पटकथाकार यांचा बहारदार काव्य वाचन आणि काव्य गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री अनघा तांबोळी यांच्या 'मराठी असे आमुची मायमाता'  या गीताने झाली . यावेळी अनघा तांबोळी यांच्या कविताना संगीतसाज चढवून  संजय किल्लेदार यांनी आपल्या बहारदार आवाजाने कार्यक्रमाची रंगत वाढवली व रसीक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अनघा तांबोळी यांच्या काव्य वाचनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचबरोबर आज तरुण पिढी  काव्यवाचन व इतर मराठी साहित्याकडे कशी वळेल याविषयी उद्बोधन आणि प्रबोधन याप्रसंगी करण्यात आले. त्यांच्या कथावाचनाची झलकही यावेळी पहावयास मिळाली.

संजय किल्लेदार यांच्या काव्य वाचनाबरोबर त्यांनी जाहिराती, जिंगल्स याचीही झलक पाहायला मिळाली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम.ए. ठाकूर यांनी केलेे ते बोलताना म्हणाले की मराठी भाषेचा आदर राखणे गरजेचे असल्याचे सांगत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.मराठी विभाग प्रमुख प्रा. माणिक बर्गे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी बोंद्रे व  पूजा कवडेकर या एस वाय बी ए च्या विद्यार्थिनीने केले.

आभार प्रदर्शन मराठी विभागातील प्रा. सुप्रिया केसरकर यांनी केले. विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  कार्यक्रमाला उपस्थित राहून दाद दिली. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी भोंसले राणीसाहेब यांनी कार्यक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. अत्यंत उत्साहात रंगतदार कार्यक्रमाची सांगता झाली.