
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील एक सामान्य वाचक जवळपास दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करीत दिल्ली येथे झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावून एक प्रकारे दोडामार्ग तालुक्याचे प्रतिनिधित्व केले त्याबद्दल कोनाळ येथील संतोष चारी यांचे साहित्यप्रेमींमधून कौतुक होत आहे.
संतोषकुमार चारी हे दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ गावचे रहिवासी असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे आपल्या पारंपारिक सुतारकाम हा व्यवसायात कार्यरत आहेत या कामातही त्यांचा हातखंडा आहे. हा व्यवसाय करत असताना त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने आपले काम सांभाळून नियमित दैनिके , संपादकीय लिखाण वाचन करणे, दरवर्षी प्रसिद्ध होणारे विविध दैनिकांचे दिवाळी अंक खरेदी करून वाचणे विविध पुस्तके ग्रंथ यासह त्यांना वाचनाची मोठी आवड आहे. हे करत असताना त्यांची योग विज्ञान व योग साधना ज्ञानपरंपरेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या देशविदेशात कार्य करणाऱ्या योगिराज मनोहर हरकरे संस्थापित "वैदिक विश्व" या संस्थेशी ओळख झाली त्यानंतर या संस्थेने त्यांना सदस्यत्व करून घेतले.या संस्थेकडूनच गेल्या वर्षी झालेल्या अमळनेर (जळगाव)व यावर्षी दिल्ली येथे झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रतिनिधित्व करण्याची त्यांना या संस्थेने संधी दिली.
या साहित्य संमेलनातील आपला अनुभव व्यक्त करताना त्यांनी साहित्य संमेलन जवळून अनुभवताना, अनेक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांचे विचार प्रत्यक्षदर्शी ऐकण्याची संधी प्राप्त झाली.सलग तीन दिवस चाललेल्या साहित्य संमेलनात
साहित्य रसिक, दिल्ली महाराष्ट्राचे नाते, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचे विचार, राजकीय नेते आणि साहित्य संमेलन, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न व बदलत्या काळात साहित्यिकांची जबाबदारी अशा अनेक विषयावर झालेल्या साहित्यिकांच्या मौल्यवान विचार ऐकण्याची संधी प्राप्त झाली.
"वैदिक विश्व" या संस्थेशी निगडित योग विज्ञान व योग साधना याविषयी उपस्थितीनाना माहिती मार्गदर्शन देऊन पुस्तकांची विक्री करण्यात आली.
साहित्य संमेलनाहून परतल्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला व्यक्तीला साहित्य संमेलनाच्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य 'वैदिक विश्व' या संस्थेकडून लाभले त्यामुळे त्या संस्थेचे आभार व्यक्त करत अशा होणाऱ्या साहित्य संमेलनात नवोदित वाचक साहित्यिक कवी यांनी एकदा तरी सहभागी व्हावे आणि आपल्या साहित्या विषयाच्या ज्ञानात भर घालावी असे हे त्यांनी आवाहन केले आहे.