देवगडात मराठा कुणबी समाजाच्या १६,७५३ नोंदी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 20, 2024 13:56 PM
views 303  views

देवगड : देवगड येथे शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या ५८ गावांमध्ये या नोंदीची माहिती तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येत असून ज्यांना त्या अनुषंगाने जात दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा, असे आवाहन श्री. विशाल खत्री, (भा.प्र.से.) तहसिलदार देवगड यांनी केले आहे.

तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या रेकॉर्डनुसार ५८ गावांमध्ये कुणबी अथवा कुणबी-मराठा,मराठा-कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत. १८९७ पासूनच्या या नोंदी सापडल्या असून ५८ गावांमध्ये एकूण १५३९६ कुणबी, कुणबी-मराठा ८७५ व मराठा-कुणबी ४८२ अशा १६७५३ नोंदींचा समावेश आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार, संबंधीत नोंदीनुसार लाभार्थ्यांना जात दाखले देण्यात येणार आहेत. यासाठी त्या ५८ गावांमध्ये तलाठी कार्यालयांच्या ठिकाणी या नोंदी प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधीत लाभार्थ्यांना जर जातीचे दाखले हवे असतील तर त्यांनी पुराव्यांसहीत अर्ज सादर करावयाचा आहे. तलाठी पातळीवरूनही अर्जाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. याबाबतची

सुरूवातही शुक्रवारपासून करण्यात आलेली आहे.याबाबत दाखले हवे असणाऱ्यांनी ,  याचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री. विशाल खत्री, (भा.प्र.से.) तहसिलदार देवगड यांनी केले आहे.