मनीषा गोवेकर यांना नारी सन्मान पुरस्कार प्रदान

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टीपर्पज बँक, शाखा शिरोडा यांच्यावतीने सन्मान
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 04, 2022 15:31 PM
views 303  views

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांना लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टीपर्पज बँक, शाखा शिरोडा यांच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा 'नारी सन्मान पुरस्कार' सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार वितरण सोहळा मराठी शाळा रंगमंच धाकोरा येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिरोडा शाखा व्यवस्थापक अनुराधा मसूरकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्नेहा मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी मुळीक, मुख्याध्यापक दिलीप जाधव, श्री. सांगेलकर, अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर, मुख्य गटप्रवर्तक अपर्णा राळकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य संध्या मुळीक, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मुळीक, सागर मुळीक, सचिन मुळीक आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शाखा व्यवस्थापक अनुराधा मसुरकर यांनी केले. यावेळी दर्शना तेली, सोनू कांबळी, गजानन मिस्त्री, सुमन झांट्ये आदी उपस्थित होते.

दरम्यान, मनीषा गोवेकर म्हणाल्या की, केवळ पुरस्कारासाठी काम करू नये. आपण आपल्या जीवनात नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासून लोकांचे अश्रू पुसावेत. हे पुण्याचे काम माझ्या हातून होत आहे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले नेहमीच प्राधान्य राहील, असेही गोवेकर म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दर्शना तेली यांनी केले. तर आभार अनुराधा मसुरकर यांनी मानले.

गोवेकर यांचे उल्लेखनीय कार्य 

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा गोवेकर यांनी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय योगदान दिले आहे. ग्रामीण भागात आपल्या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून त्यांनी कोविड काळात घरोघरी जाऊन औषधे पुरविली आहेत. तसेच आजगाव, धाकोरा,  शिरोडा या पंचक्रोशीत त्या नेहमीच विविध शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही त्या करतात. महिलांसाठी आरोग्य शिबिरे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे,  विशेष म्हणजे केवळ महिलांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर करणे यांसारखे अभिनव उपक्रम मनीषा गोवेकर यांनी राविले आहेत. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टीपर्पज बँक शाखा शिरोडाच्या वतीने त्यांना नारी सन्मान पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.