मांगवली ब्रीजवर भगदाड...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 30, 2023 19:43 PM
views 184  views

वैभववाडी : मांगवली येथील ब्रीजवर भगदाड पडले आहे. या कोळपे मार्गे मांगवली -मौदै मार्गावरील एस.टी.बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.  सुरक्षितेच्या कारणांमुळे  परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांसह विदयार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. या ब्रीजवरील भगदाड लवकरात लवकर बुजवून एस.टी. वाहातूक सुरु करावी. अशी मागणी प्रवाशी विदयार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे.

मांगवली ब्रीजवर पडालेले भगदाडामुळे कोळपे मौंदे मार्गावरील वाहतुक बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी उपाययोजना करावी. अशी मागणी चार दिवसापूर्वी लेखी निवेदनातून काॕग्रेस तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर व काॕग्रेस जिल्हा चिटणीस मिना बोडके यांनी केली होती.

कोळपे फाटा ते मौंदे मार्गावर वेंगसर, मांगवली, हेत, आखवणे, भोम, मौंदे ही गावे येतात. या गावातील विदयार्थी व ग्रामस्थ या मार्गावरुन प्रवास करतात. या मार्गावरुन प्रवाशी व विदयार्थ्यांसाठी एस.टी.बस हेच प्रवासाचे साधन आहे. या मार्गावर मांगवली येथे अरुणा नदीवर ब्रीज असून या ब्रीजवर गेल्या काही महिण्यापासून  भगदाड पडले आहे. याबाबत स्थानिकांनी संबंधित विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती.  तरीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून या पावसाने हे भगदाड मोठे मोठे होत असून त्यामुळे ब्रीजला धोका निर्माण झाला आहे. तर या भगदाडामुळे या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी या मार्गावरील प्रमुख प्रवासाचे साधन असलेली एस.टी.बस बंद शनिवारपासून बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मौंदे गावातील विदयार्थ्यांसह या मार्गावरील इतर गावातील विदयार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार आहे.याला सर्वस्वी जि.प.बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याठिकाणी काॕक्रीटीकरण करुन ब्रीज वाहातुकीसाठी सुरक्षित करावा. अशी मागणी केली जात आहे. तसेच कोळपे फाटा ते मौंदे दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना ञास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यत यावेत अशी मागणी ही करण्यात येत आहे.

अरुणा नदीवरील ब्रीजवर भगदाड पडले आहे.ही बाब चालकांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी कणकवली आगारात माहीती दिली. विदयार्थी व प्रवाशांच्या सुरक्षितेचा विचार करुन शनिवार पासून या मार्गावरील एस.टी.बस फेरी बंद करण्यात आली आहे.तोपर्यंत ही बस उंबर्डे भुईबावडा मार्गे सोडण्यात येईल असे वैभववाडी बस स्थानकाचे वाहातुक नियंञक बी.एस.गुरखे यांनी सांगितले.