
देवगड : गतवर्षी हवामानातील बदलामुळे जेमतेम २० ते २५ टक्केच आंबा पीक होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा हंगाम चांगला आहे. मात्र, सुरुवातीपासून आंबा पीक वाचवण्यासाठी बागायतदारांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. यावर्षी तुडतुडा बुरशी,कीडी सह थ्रीप्सने बागायतदारांचे चांगलेच कंबरडे मोडले. फवारणी करुनही थ्रीप्स हटत नसल्या बागायतदार हैराण झाले.एकीकडे आंबा काढणी तर दुसरीकडे झाडांवरील मोहराच्या संरक्षणासाठी कीटकनाशक फवारणी अद्याप शेतक-यांना करावी लागत आहे.
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवली त्यामुळे नौव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच मौहर प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. मात्र अवेळीचा पाऊस,ढगाळ हवामान, मध्येच थंडी गायब एकूणच मिश्र हवामानामुळे काही ठिकाणी मोहर खराब झाला. मात्र, मौहर वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना यश आले त्या शेतकऱ्यांनी आंबा फेब्रुवारीत विक्रीला पाठविला. डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. त्यावेळी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला होता. तुडतुडे कीडरोगांवर बागायतदारांनी नियंत्रण मिळविले होते. परंतु महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत नव्हता. बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापीठाकडे याबाबत संशोधनाची मागणी केली.
हवामानातील बदलामुळे फेब्रुवारीतील थंडीमुळे मोहर येत राहिला. मोहर वाढल्यामुळे तो वाचविणे गरजेचे होते. अन्यथा मोहरावरील तुडतुडा, थ्रीप्स बागेतील अन्य झाडांवर आबा फळांना प्रभावित करत होते. त्यामुळे आंबा व नवीन मोहर वाचविण्यासाठी बागायदारांना अधिक परिश्रम घ्यावे लागले. थ्रीप्सवर संपूर्ण नियंत्रण मिळण्यात बागायतदार अयशस्वी ठरले. अखेर जसजसा आंबा तयार होईल तसा काढून तो बाजारात विक्रीसाठी पाठवू लागले. त्यामुळे एकीकडे आंबा काढणी तर दुसरीकडे कीटकनाशक फवारणी अशी दुहेरी कामे बागायतदारांना करावी लागतहोती.
शासनाकडून अनुदान उपलब्ध होत असल्याने लागवडीखाली क्षेत्र वाढले, मात्र हवामान बदलाचा परिणाम उत्पादनावर झाला.फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादकतेत घट झाली असल्याचे बागायदारांकडून सांगण्यात येत आहे. दरवर्षी आंबा पीक वाचविण्यासाठी बागायतदारांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तुलनेने आंब्याला दर उपलब्ध होत नसल्याने बागायदारांची मेहनत वाया जाते. हवामानातील बदलामुळे आंबा पीक नैसर्गिक दृष्टचक्रात फसले असून, त्यामुळे शेतकयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
आंबा लागवड वाढत असताना निव्वळ बाजारभावावर अवलंबून रहावे लागते. यामध्ये शेतकयांचे नुकसान होते. प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली तरी आंब्यापासून विविध पदार्थ तयार करून विक्री व्यवसायात वाढ होऊन त्याचा बागायतदारांना फायदा होणार आहे. शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व्यवसायासाठी योजना राबविण्यात येत असतानाच त्यासाठी असलेले निकष शिथिल करणे आवश्यक आहे.
एकीकडे थ्रीप्स चे संकट झेलत असतानाच आता फळमाशीचा प्रादुर्भाव हळू हळू होऊ लागला आहे. फळमाशीमुळे आंबा निर्यातीला अडसर निर्माण होतो.परदेशात सध्या आंब्याला चांगली मागणी आहे.मात्र फळमाशी नियंत्रणात न आल्यास शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. कृषी विद्यापीठाकडून फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिवाय बागेत पिकून पडलेला. सडलेला आंबा निवडून तो खड्डा काढून गाढून टाकण्याची सूचना करण्यात आली आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव एकीकडे हवामानातील बदलामुळे कीड रोगामुळे होणारे नुकसान तर दुसरीकडे माकड़,वानरांचा वाढता उपद्रव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. बागेत वन्य प्राणी, माकड, वानरांचा वाढता उच्छाद यामुळे बागायतदार कंटाळले आहे. शाससाकडे उपाययोजना राबविण्याची सूचना केली जात आहे. काही बागायतदार मोहर व फळांच्या संरक्षणासाठी झाडांना जाळी बसवत आहेत.










