आंबा बागायतदारांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांचा जाळला होता पुतळा
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 17, 2026 11:53 AM
views 118  views

देवगड : आंबा हंगामातील नुकसानीबाबत शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आंबा बागायतदार व व्यापारी संघटनेच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनानंतर देवगड पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

आंबा बागायतदारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी देवगड परिसरात राज्य महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात आंबा बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह गणेश वाळके, किरण टेंबुलकर, राजेश पाटील, विजय पाटील, उमेश कुलकर्णी, सुधीर तांबे, तेजस मामघाडी, प्रसाद दुखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्य महामार्गावर पुतळा दहन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार संबंधित आंदोलनकर्त्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस करत आहेत. आंबा हंगामात झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे बागायतदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.