
देवगड हापूसचा जीआय टिकविण्याचे आवाहन
देवगड : “प्रत्येक गावाचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणारे कुणकेश्वर हे पहिले गाव ठरत आहे. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनाचे आणि आनंदाचे ‘हॉटस्पॉट’ आहे. अशी आनंददायी पर्यटनस्थळे अधिक प्रमाणात विकसित झाली पाहिजेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचे सचिव संतोष रोकडे यांनी केले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र अनलिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कुणकेश्वर एमटीडीसी रिसॉर्ट येथे आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर गावचे सरपंच महेश ताम्हणकर, कुणकेश्वर रिसॉर्ट व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण, अजिंक्य सर, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, किरण जाधव, देवस्थानचे माजी अध्यक्ष संतोष लब्दे, माजी सरपंच गोविंद घाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष रोकडे पुढे म्हणाले की, “कुणकेश्वर गाव प्लास्टिकमुक्त होणे ही काळाची गरज आहे. गावात पर्यटनविषयक माहिती देणारे प्रशिक्षित टूर गाईड तयार झाले, तर पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल. पर्यटनासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी एमटीडीसीकडून आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन दिले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने गाव समृद्ध झाले, तर येथे येणारा पर्यटक दर्शन घेऊन मालवण-तारकर्लीकडे न वळता कुणकेश्वरमध्येच अधिक काळ थांबेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी देवगड हापूस आंब्याच्या अस्सल ओळखीबाबतही चिंता व्यक्त केली. “या भागातील आंब्याचे रोप दुसरीकडे नेऊन लावले, तरी त्या मातीत देवगड हापूसची खरी चव आणि गुणवत्ता निर्माण होत नाही. सध्या सर्वत्र देवगड हापूस बॉक्सची चर्चा होते; मात्र अनेकदा त्या बॉक्समध्ये अस्सल देवगड हापूस नसतो. त्यामुळे देवगड हापूसचा जीआय दर्जा टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्याजमुक्त व तारणमुक्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पर्यटनातून स्थानिक विकासाला मोठी चालना मिळू शकते आणि शाश्वत विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो, असे मत संतोष रोकडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन व पर्यटन विभाग पर्यटनवृद्धीसाठी कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
“कोणतेही व्याज नाही, कोणतेही तारण नाही अशा विविध योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा. विशेषतः महिलांसाठी असलेल्या ‘आई’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. प्लास्टिकमुक्त गाव आणि बहुभाषिक गाईड ही या भागाची गरज आहे. स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास पर्यटनातून स्वतःचा आणि गावाचा विकास निश्चित साधता येईल,” असे आवाहनही त्यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार सिद्धेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी देवस्थानच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना दिल्याचे सांगितले. “आंबा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असून पर्यटन महामंडळ आणि देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केल्यास भविष्यात त्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होईल. शासनाची इच्छा असल्यास पुढील महोत्सव संयुक्तपणे आयोजित करण्यास देवस्थान ट्रस्ट तयार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सरपंच महेश ताम्हणकर यांनी कुणकेश्वर गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. तसेच देवस्थानचे माजी अध्यक्ष संतोष लब्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले. आकर्षक मंडप, विविध सजावट आणि अनेक स्टॉल्समुळे आंबा महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. पुढील तीन दिवस सुरू राहणाऱ्या या महोत्सवात आंबा विक्रीसोबत विविध प्रदर्शन व माहितीपर स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महोत्सवादरम्यान पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. दहावी-बारावीनंतर पर्यटन क्षेत्रातील उपलब्ध अभ्यासक्रम, विविध कर्ज योजना, महिलांसाठी असलेली ‘आई’ योजना तसेच पर्यटन खात्याच्या महत्त्वाच्या ‘न्याहारी, निवास आणि आहार’ योजनेसाठी नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देवगड हापूससाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार असून पर्यटन क्षेत्रातून स्थानिकांना विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सागर जोईल यांनी केले.










