बदलत्या वातावरणाचा आंबा - काजूला फटका..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: February 02, 2024 13:51 PM
views 139  views

कुडाळ : प्रसाद पाताडे | सध्या राज्यात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. तळ कोकणात बदलत्या हवामानाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. सिंधुदुर्ग काजू झाडाला फक्त 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कुडाळ तालुक्यातील शेतकरी विजय प्रभू यांनी काजू बिला दोनशे रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी केली असून रस्त्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बदलत्या हवामानामुळे काजू बी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदल्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकरी राकेश कदम यानी दिली आहे. यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही  बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार असल्याचं काजू बागायतदार शेतकरी राकेश कदम यांनी सांगितलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना बाजारात काजू बिला मिळणारा भाव हा तुटपुंजा असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात बाजारात सद्यस्थितीत काजू मिळणारा भाव 80 ते 90 रुपये असून या भावामुळे काजू बीच्या फळ धारण्यासाठी शेतकऱ्याला करावा लागलेला फवारणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात पाहायला मिळत आहे.

काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षापूर्वी प्रतिकिलो २०० रुपये असणारा काजू बीचा दर १०० ते ८० रुपयांवर आला आहे. त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक अडचणीत आलेत. त्यामुळे शासनाने काजू उत्पादकांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी २०० रुपये हमीभाव द्यावा, अन्यथा २६ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी शासनाला दिला आहे.

चार-पाच वर्षांपूर्वी काजू बीचा दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेला होता. परंतु, शासनाने काजूवरील आयातशुल्क कमी केले. त्याचा मोठा परिणाम काजू बीच्या दरावर झाला. काजू बीचे दर घसरून २०० वरून १०० ते ८० रुपयांवर आला. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे काजू बीला कमीतकमी १९३ रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी उत्पादकांनी केली. 

काजू बी आता बाहेरील देशातून येथे येते. त्याची किंमत म्हणजे खरेदी दर सुद्धा कमी आहे. त्यामुळे कोकणातील काजू बीचा दर गडगडला आहे. यामुळे जिल्हयातील काजु बागायतदार शेतकरी अडचणीत आला आहे. यावर राज्य शासनाने काजू शेतकऱ्यांना २०० रुपये हमीभाव द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा काजू बागायतदार शेतकरी विजय प्रभू यांनी दिला आहे.

काजू बीला हमीभाव नसल्याने येथील बागायतदार अडचणीत सापडला आहे. आता काजू बी दर ८० वर आला असून तो उत्पादन खर्चाच्या दीडपट दर मिळावा, ही आमची अपेक्षा आहे. याची राज्य सरकार सह केंद्र सरकारने ही दखल घेत काजू बागायतदार शेतकऱ्याला दोनशे रुपये तरी हमीभाव द्यावा अशी मागणी काजू बागायतदार शेतकरी विश्वनाथ प्रभू यांनी केली आहे.