
देवगड : कलम बागेतून सुमारे 17 हजार किंमतीच्या आंब्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या मुळे हिंदळे चिंचवला येथील या प्रकारामुळे येथील परिसरात खळबळ उडाली आहे.
देवगड तालुक्यातील हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे 17 हजार 500 रुपये किंमतीच्या 35 पेटी कच्च्या आंब्यांची चोरी केल्याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अविनाश श्रीपत राणे (हिंदळे राणेवाडी) यांनी दिली आहे. ही घटना 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. ते 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. या मुदतीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश राणे यांचे काका व कृष्णा धोंडू मेस्त्री यांची एकत्रित आंबा कलम बाग हिंदळे चिंचवला या भागात आहे. ही बाग देखरेख व आंबा फळे तोडणीकरिता फिर्यादी अविनाश राणे यांच्या ताब्यात आहे. या बागेतून 35 पेटी कच्च्या आंब्याची चोरी झाल्याचे अविनाश राणे यांच्या सोमवारी सकाळी निदर्शनास आले. याबाबत त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरीस गेलेल्या आंब्याची किंमत सुमारे 17 हजार 500 रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व हवालदार गणपती गावडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.