मंगेश तळवणेकरांचा साधेपणा

दुचाकीवरून प्रचार ; थेट बांधावर जाऊन संवाद
Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2026 16:23 PM
views 51  views

सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मंगेश तळवणेकर यांनी अनोख्या आणि थेट जनतेशी जोडणाऱ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. ना मोठी कार्यकर्त्यांची फौज, ना वाहनांचा ताफा-केवळ दुचाकीवरून थेट बांधावर जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.


आज कारिवडे येथील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला भगिनी व बांधवांची श्री. तळवणेकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. शेतात राबणाऱ्या हातांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी ‘एकला चलो’चा नारा देत भावनिक साद घातली. वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत त्यांनी प्रचाराचा वेगळा आदर्श मतदारसंघासमोर ठेवला आहे. अनेक वर्षांनंतर राजकीय मैदानात पुनरागमन करणाऱ्या मंगेश तळवणेकर यांच्या भेटीने मतदारसंघातील आबालवृद्ध भावूक झालेले पाहायला मिळत आहेत. आपण एकटे नाही, आपल्या मागे हजार उभे आहेत असा विश्वास मतदारांकडून व्यक्त होत असून त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थेट जनतेच्या दारात जाऊन, सामान्यांच्या प्रश्नांशी स्वतःला जोडणारी ही ‘वन मॅन शो’ रणनीती आगामी निवडणुकीत किती यशस्वी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.