तर दहा वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच काम का झाले नाही : मंगेश लोके

Edited by:
Published on: October 15, 2024 16:09 PM
views 337  views

वैभववाडी : केवळ निवडणुकीच्या तोंडावर ललोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आयटी नामांतरणाचा घाट घालण्यात आला. शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शहीद पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांचे नाव दिले ही खरोखरच वैभववाडी तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहेच परंतु या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत गेल्या दहा वर्षात का होऊ शकली नाही असा प्रश्न ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके उपस्थित केला आहे.

लोके यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की,शहीद विजय साळसकर हे पोलीस दलाची शान होते.त्यांनी देशासाठी केलेले काम कुणालाही विसरता येणार नाही.त्यामुळे त्यांचं आयटीआयला नाव दिल हे वैभववाडीकरांसाठी अभिमास्पद आहे.मात्र त्यामागे राजकीय हेतू असणे चुकीचे आहे.कारण  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कामकाज सध्या एडगाव येथील खाजगी इमारतीत सुरू आहे.अपुऱ्या जागेअभावी येथे प्रशिक्षण घेताना अनेक अडचणी येत आहेत.काही वर्षापुर्वी या संस्थेकरीता वैभववाडी-फोंडा मार्गालगतची जागा उपलब्ध झाल्याचे सांगीतले गेले.या सर्वाला आता दहा वर्षाचा कालावधी लोटला आहे.परंतु औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला हक्काची,मालकीची जागा मिळालेली नाही आणि हक्काची इमारत देखील उभी राहीलेली नाही.

हे संपुर्ण अपयश हे या भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार नितेश राणेंचे आहे.गेल्या दहा वर्षात त्यांना जमीन उपलब्ध घेवुन त्या ठिकाणी इमारत उभारता आली नाही.त्यांना तालुक्यातील विकासकामांबाबात काहीही सोयरसुतक नाही.केवळ स्टंटबाजी करणे एवढेच काम ते प्रामाणिकपणे करतात.त्याचा मोठा परिणाम तालुक्याच्या विकासावर झाला आहे.तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलबिंत राहीलेले आहेत.माजी आमदार प्रमोद जठार यांनी ऊस संशोधन केंद्र मंजुर घेण्याकरीता प्रयत्न केले.रेल्वे स्थानक परिसरात त्याकरीता जागा उपलब्ध करून दिली.ऊस संशोधन केंद्रांच्या माध्यमातुन तेथे काही प्रमाणात काम देखील सुरू झाले.परंतु त्याठिकाणी इमारती,अधिकारी कर्मचारी वर्ग भरती,यासह विविध  प्रकिया आजमितीस राबविण्यात आलेली नाही.शासनाकडुन निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.त्यामुळे तालुक्याच्या हितासाठी एकही काम आमदार नितेश राणेंनी केलेले नाही.निवडणुकीच्या तोंडावर केवळ भपकेबाजी करण्याचे काम त्यांनी सध्या सुरू केलेले आहे.रेल्वे स्थानकातील मंजुर असलेल्या पादचारी उड्डाण पुलाचे भुमिपुजन केले.परंतु तेथील तिकिट आरक्षण,कोटा याबाबत ते काहीही करीत नाही ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.