
दोडामार्ग : सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक यां राज्यांना लागून असलेला दोडामार्ग तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली (फणसवाडी) येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. प्रवाहित झालेल्या धबधब्यामुळे पर्यटक वर्गात उत्साह दायक वातावरण पसरले आहे. मात्र कोसळणारा पाऊस बंद झाल्यास धबधब्याचा प्रवाह देखील बंद होणार असल्याचे तेथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा प्रवाहित झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, बेळगांव, येथून वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात. या परिसरात रिमझिम बरसणारा थंडगार पाऊस, दाट धुके, मनमोहक निसर्ग सौंदर्य, दूरवर दिसणारा तिलारी धरणाचा विस्तीर्ण जलाशय अशा अनेक गोष्टींमुळे पर्यटकांची पाऊले येथे वळतात. त्यामुळे हा परिसर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो, त्यात पावसाळ्यात या सर्व गोष्टी पर्यटकांना एकत्रित अनुभवता येत असल्याने मांगेलीत बहुसंख्येने पर्यटक दरवर्षी दाखल होत असतात. यावर्षीही अनेक पर्यटक दाखल होणार असल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वनियोजन म्हणून उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचेही अनेकांकडून सांगण्यात येत आहे.