
मालवण : उबाठा शिवसेनेच्या दांडी येथील माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख सन्मेष परब यांचा काल भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी महिला व बालकल्याण सभापती दर्शना कासवकर, भाई कासवकर, अशोक कासवकर व युवा सेना उपशहरप्रमुख अमन गोडावले यांच्यासह उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. गेले काही दिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले असणाऱ्या या दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्याला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळाला आहे. या दिग्गजांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे पाठबळ मिळणार आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंदार केणी हे धुरीवाडा प्रभागातून तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस मधून केली. त्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेस मध्ये आले. त्यावेळी ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. मात्र २०१८ मध्ये राणेंची साथ सोडून त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. तर माजी बांधकाम सभापती यतीन खोत हे मागील दोन टर्म नगरसेवक असून कट्टर शिवप्रेमी व हिंदुत्ववादी अशी त्यांची ओळख आहे. ते देखील मंदार केणी यांच्या सोबत काँग्रेस मधून ठाकरे शिवसेनेत आले होते. त्यांचा ही ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क आहे.माजी आ. वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले म्हणून या दोन्ही नगरसेवकांची ओळख होती. मंदार केणी यांना वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते पद दिले होते. तर माजी नगरसेविका दर्शना कासवकर या देखील तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या सर्वांचा भाजप प्रवेश ठाकरे गट आणि माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का देणारा आहे.
आज मुंबईतील पक्ष प्रवेश कार्यक्रमात मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, भाई कासवकर - शाखाप्रमुख, नंदा सारंग - उपशहरप्रमुख, नितीन पवार - शाखा प्रमुख, सई वाघ - शाखाप्रमुख, अमन घोडावले - उप शहरप्रमुख युवासेना, संजय कासवकर - शाखाप्रमुख, अशोक कासवकर आदींनी भाजपात प्रवेश केला.