
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मंदार जोशी यांची निवड झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षपदी सीए मंदार जोशी, उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सचिव सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए नचिकेत जोशी, विकासा अध्यक्ष सीए अनुप शहा, सदस्य सीए शरद वझे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी २०२५ ते २०२९ पर्यंत कार्यरत राहणार आहे. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या कार्यालयात या नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी मावळत्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, माजी उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, माजी अध्यक्ष सीए आनंद पंडित, सीए मुकुंद मराठे, सीए प्रसाद आचरेकर आदी उपस्थित होते.
रत्नागिरीतील सीए आणि विविध वित्तीय संस्था, व्यावसायिक आदींसाठी वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी व्यक्त केला. शाखेच्या सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.