
मंडणगड : गेल्या सहा दिवसांपासून सर्व प्रकारचे वाहतूकीसाठी बंद असलेल्या शहरातील गांधी चौक मार्गावर भराव खचल्याने धोकादायक झालेल्या फरशीचे दुरुस्तीकरिता आमदार योगेश कदम यांनी पाठपुरावा केलेला असल्याची माहीती नगरपंचायत विरोधीपक्ष गट नेते विनोद जाधव यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत आमदार योगेश कदम यांनी नमुद ठिकाणी नवीन पुल बांधण्यात यावा या करिता नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 60 लाख रुपयांच्या निधीची मागणी केलेली असल्याची माहीती गटनेता विनोद जाधव यांनी दिली आहे.
गांधी चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची मुख्य संरक्षक भिंती जवळचा भराव अतिवृष्टीत खचल्याने आपत्ती निवारण कक्षाचेवतीने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली त्यामुळे चार गावांची वाहतूक प्रभावीत झाली या नव्या परिस्थितीनुसार सत्ताधारी विरोधकांसह नगरपंचायतीची प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. हा पुल पन्नास वर्षे जुना असल्याने धोकादायक झालेले असल्याचे वेळोवेळी लक्षात येऊनही पुलाचे दुरुस्ती अथवा नवीन पुलाचे निर्मीतीकरिता सर्व संबंधीत घटकांकडून कोणतीही हालचाल भुतकळात न झाल्याने संबंधीत सर्व अपघातातून जिवीत हानीची प्रतिक्षा करीत होते का असा प्रश्न चार गावातील समस्याग्रस्त नागरीक उपस्थित करित असल्याने, या पार्श्वभुमीवर गटनेते विनोद जाधव, यांनी आमदार योगेश कदम यांच्यामाध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्याने ही समस्या सुटण्याची अंधुकशी का होईना आशा निर्माण झाली आहे.