भीषण अपघातात आंबडपाल येथील व्यक्तीचा मृत्यू

बोलेरो पिकअपला धडक बसल्याने घडली दुर्घटना
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 08, 2026 18:35 PM
views 176  views

कुडाळ  : कुडाळ शहरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात आंबडपाल येथील पुंडलिक नाईक या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बोलेरो पिकअपला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या या अपघातात नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून, या घटनेमुळे आंबडपाल गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक नाईक हे आपल्या दुचाकीने कुडाळ येथून आंबडपाल येथील आपल्या घराकडे जात होते. कुडाळमधील कृष्णाई सुपर मार्ट जवळ आले असता, त्यांच्या समोर चालत असलेल्या बोलेरो पिकअपला नाईक यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

रोहित भोगटे यांचे प्रसंगावधान

अपघातात पुंडलिक नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. यावेळी शिवसेना तालुका संघटक रोहित भोगटे यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नाईक यांना तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र दुखापत अतिशय गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

पुंडलिक नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच आंबडपाल गावासह कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात परिवार असून सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.