
सावंतवाडी : शहरातील मच्छीमार्केटच्या दुरावस्थेकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत आहे. प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना एक महिन्यापूर्वी या समस्या सांगून त्यानंतर त्यांच्याकडून मच्छी मार्केटची पाहाणी देखील करण्यात आली. मात्र, केवळ पोकळ आश्वासने त्यांच्याकडून दिली गेली. मार्केटमधील गटारांवरील लोखंडी जाळ्या तुटल्याने नागरिकांचे पाय अडकून कालच एका वयोवृद्ध व्यक्तीसह, नागरिक येथे पडून जखमी झाले. न.प. चे कर्मचारी देखील घसरून पडल्याने जखमी झालेत. त्यामुळे याला जबाबदार कोण ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे.
मच्छी मार्केट येथील या समस्यांवर प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मार्केटमधील गटारांवरील लोखंडी जाळ्या तुटल्याने नागरिकांचे पाय अडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कालच एका वयोवृद्ध व्यक्तीसह अन्य काही नागरिक येथे पडून जखमी झाले. या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले होते. यानंतर मुख्याधिकारी यांनी स्वतः मच्छी मार्केट परिसराची पाहाणी केली होती. मात्र, त्यानंतर देखील परिस्थिती न बदलल्याने श्री. सुर्याजी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अपघातांना जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीचे अद्ययावत मच्छी मार्केट शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. काही वर्षांपूर्वीच या मार्केटचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखभालीच्या अभावामुळे याची दुरवस्था झाली आहे. मासळी धुण्याचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या गटारांवरील लोखंडी जाळ्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच फरश्या तुटल्याची अवस्था आहे. या उघड्या जाळ्यांमुळे मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
काल मासळी खरेदीसाठी आलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा पाय या तुटलेल्या जाळीत अडकल्याने ते खाली कोसळले. याशिवाय अन्य दोन नागरिकही अशाच प्रकारे पडून जखमी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांची माहिती असूनही प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ नवीन जाळ्या बसवाव्यात आणि मार्केटची डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांकडून केली जात आहे.










