रेडीची दशावतार कलेशी जोडलेली नाळ प्रत्येक पिढीत टिकून : मनिष दळवी

खासदार राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त ; रेडीतील दशावतार नाट्यमहोत्सवाने सुरुवात
Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2026 17:41 PM
views 192  views

वेंगुर्ले : रेडी गावाची व दशावतार कलेशी नाळ जोडलेली आहे. या गावातील सर्व युवा ही कला पुढे घेऊन जात आहे. खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एक महोत्सव असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त  कोकणातील कला संस्कृती टिकली पाहिजे या उद्देशाने प्रितेश राऊळ मित्रमंडळ दशावतारी नाट्यमहोत्सव आयोजित करते याचा अभिमान आहे. पुढील काळात रेडी गावाला पर्यटन दृष्ट्या वेगळी ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प महायुती शासनाच्या माध्यमातून हाती घेतले आहेत. पर्यटन दृष्ट्या एक मोठे दालन उपलब्ध होईल याची मला खात्री आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचे या भागावर विशेष लक्ष आहे. यामुळे प्रितेश राऊळ व मित्रमंडळाने असेच सातत्याने काम करत राहावे. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी रेडी येथे केले. 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत व दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी मनिष दळवी बोलत होते. सर्वप्रथम जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून व मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दशावतार महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष व जि. प आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, रेडी सरपंच रामसिंग राणे, पं स सदस्य प्रियांका घाटवळ, म्हापण सोसायटी चेअरमन आनंद गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, रेडी उपसरपंच आनंद भिसे, देवस्थान मानकरी दादा नाईक, प्रकाश कामात, ग्रा प सदस्य नमिता नागोळकर, मानसी राणे, सागर रेडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष गोपाळ राऊळ, प्रभाकर राऊळ, रमाकांत राणे, भाजप उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, आरवली शक्ती केंद्रप्रमुख जगन्नाथ राणे, तुषार साळगावकर, भूषण सारंग, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक देवेंद्र नाईक, संदीप धानजी, महादेव नाईक, बाळू कांबळी, विनोद राणे, दीपक राणे, त्रिंबक आजगावकर आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले, या महोत्सवाला मी ५ ही वर्षे उपस्थित राहिलो आहे. प्रितेश राऊळ यांची एक कार्यकर्ता म्ह्णून आपल्या गावासाठी असलेली तळमळ नेहमीच पाहायला मिळते. जिल्ह्यात विकासात्मक प्रत्येक गोष्ट आपल्याला गावासाठी उपलब्ध व्हावी यासाठी प्रितेश व त्यांचे सहकारी सातत्याने काम करत असतात. या रेडी गावाच्या विकासाची जबाबदारी प्रितेश व सरपंच रामसिंग राणे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. प्रितेश याच्या कार्याची नोंद आजही राजकीय क्षेत्रांत घेतली जाते, म्ह्णून पुन्हा एकदा आरोग्य व शिक्षण सभापती पदाची जबाबदरो राणे कुटुंबियांनी त्यांच्यावर दिली असल्याचे गौरवोद्गारही श्री दळवी यांनी काढले. 

प्रसाविकात मंडळाचे अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ म्हणाले, दशावतारी नाट्य महित्सवाचे हे ५ वे वर्ष आहे. प्रितेश राऊळ मित्रमंडळ सांस्कृतिक क्षेत्रासहित शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, क्रीडा या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. गेली १७ वर्ष सातत्याने रक्तदान शिबिर मंडळामार्फत सुरू आहे. रेडी गावातून दशवताराची सुरुवात झाली. बाली मास्तर, जयसिंग राणे यासारखे प्रसिद्ध दशावतारी या मातीने दिले. जिल्ह्यात रेडी गावातून नाट्यमहोत्सवाच्या या संकल्पनेची सुरुवात झाली.  हा नाट्य महोत्सव जेष्ठ दशावतारी कै. जयसिंग राणे याना समर्पित करतो. खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र याची सुरुवात रेडी गावातून या नाट्य महोत्सवाने होतेय याचा आनंद आहे. भविष्यात मंडळा मार्फत युवकांना रोजगार प्रशिक्षण देऊन एक उद्योग गावात आणण्यासाठी खासदार राणे यांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे राऊळ यांनी सांगितले. 

रेडी गावात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमात हा नाट्य महोत्सव मैलाचा दगड आहे. प्रितेश राऊळ यांचे कार्य बघून पुन्हा त्यांना आरोग्य व शिक्षण सभापती पद खासदार राणेंच्या आशीर्वादाने प्राप्त झाले. या महोत्सवाला आपण शुभेच्छा देत असल्याचे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी सांगितले. आजचा हा कार्यक्रम अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. अशाप्रकारचे उपक्रम राबवून आपल्या परंपरेला जपण्याचे व काम हे मंडळ करत आहे. खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा दशावतारी महोत्सव आयोजित करणे ही गौरवाची बाबा असल्याचे पं स सदस्य प्रियांका घाटवळ म्हणाल्या.

खासदार राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक विशेष ओळख आहे. प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे काम रेडी गावात अग्रेसर आहे. राणे कुटुंबियांमुळे रेडी गावात जी लाखात विकासकामे येत होती ही आज कोट्यवधींची कामे आली आहेत. रेडी गावात अनेक नाट्यप्रेमी असल्याने ही लोककला पुढे घेऊन जाण्याचे मंडळाचे काम कौतुकस्पद असल्याचे सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले. या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम राणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रितेश राऊळ यांनी केले.