
मालवण : मागच्या १० वर्षात माजी आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे किती प्रश्न सोडवले ? फक्त टीका करणे आणि 'जेलसी' बाळगणे यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. १० एप्रिल हा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. विकासकामांवर बोलायला काही नसल्याने, केवळ वाढदिवसाला गालबोट लावण्यासाठी मत्स्य विभागावर मोर्चा काढण्याचे राजकारण माजी आमदारांकडून केले जात आहे. हे लोकांच्या हिताचे नसून संकुचित मनाचे दर्शन आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर ९० लाखांचा दंड ठोठावणारा मी पहिला व्यक्ती होतो. मी कधीही चुकीच्या कामाला पाठीशी घातलेले नाही. आधी दहा वर्षात काय केले ते जाहीर करावे नंतर त्यांनी खुशाल मोर्चे काढावे असे आव्हान आमदार निलेश राणे यांनी दिले आहे.
निलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हे आव्हान दिले. तळाशील येथील ग्रामस्थांनी वाळू उपसा आणि अनधिकृत बोटींच्या मुद्यावर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यावर बोलताना आमदार राणे म्हणाले की, तळाशील हा 'नोटीफाईड स्पॉट' असल्याने तिथे वाळू उपसा होऊच शकत नाही, याची १०० टक्के खात्री प्रशासनाने दिली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी निसटलेल्या अनधिकृत बोटींच्या संदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
मच्छीमारांची बांधकामं नियमीत होणार :
जिल्हाधिकारी कार्यालयात सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत आज सकारात्मक तोडगा निघाला आहे. तळाशील गावातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद राहणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बांधकामांचा प्रश्न मार्गी लावत ८० टक्के जमिनी आपोआप नियमित होणार आहेत. सीआरझेडच्या नोटिशींमुळे धास्तावलेल्या किनारपट्टीवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय धोरणानुसार ८० टक्के जमिनी या स्वयंचलित नियमित होणार आहेत. उर्वरित २० टक्के लोकांनाही विस्थापित केले जाणार नाही, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. कोळीवाडे आणि गावठाण विस्तार ज्या धर्तीवर मुंबईत नियमित झाले, त्याच धर्तीवर आपल्या भागातील गाबीत आणि भंडारी समाजाला जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले. भविष्यात 'ग्रीन ट्रिब्युनल' मध्ये कोणी तक्रार केली तरी मच्छीमारांना त्रास होऊ नये, यासाठी हा कायमस्वरूपी तोडगा काढला जात असल्याचे आमदार श्री. राणे म्हणाले.
मी प्रत्येक विषय पारदर्शकपणे सोडवत
विरोधकांनी कितीही टीका केली तरी मला फरक पडत नाही, उलट माझे चांगलेच होते. आम्ही प्रत्येक विषय पारदर्शकपणे सोडवत आहोत. किनारपट्टीचा मच्छीमार हाच तिथला खरा मालक आहे आणि त्याला तो हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तळाशील ग्रामस्थांची मागणी असलेल्या कालावल खडीपत्रातील ज्या भागात वाळू उत्खननास बंदी आहे त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे वाळू उत्खनन परवानगी दिली जाणार नाही. त्यासोबतच तळाशील येथे गाव सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेला बंधारा लवकर सुरू होईल आणि सर्व ग्रामस्थांसोबत असल्याचे श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
वैभव नाईकांची फक्त स्टंटबाजीच
गेल्या दहा वर्षात काहीच न केलेल्या माजी आमदारांनी केवळ स्टंटबाजी व देखाव्यासाठी १० एप्रिल रोजी ही तारीख निवडून मोर्चा काढण्याची स्टंटबाजी करण्याचा प्रकार सुरू आहे. राणे साहेबांचा वाढदिवस १० तारीखला आहे आणि हीच तारीख लक्ष वेधण्यासाठी निवडली आहे. मात्र, जनतेला सर्वकाही माहिती आहे. १० वर्षात माजी आमदार वैभव नाईक यांनी काही केले नाही आता दिखावा करण्याचे काम सुरू आहे. मात्र आम्ही मच्छीमारांच्या सोबत आहोत. मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ जनतेला काहीच मिळाले नाही. जनतेचे सर्व प्रश्न आहे त्याच स्थितीत राहिले. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. - जनतेचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे. तसेच मोठा विकासनिधी मतदार संघात आणणे हेच आमचे लक्ष आहे. माजी आमदार यांच्यावर टीका टिपणी करण्यात आम्हाला कोणतेही स्वारस्थ नाही. जनतेची सेवा आणि विकास हेच आमचे लक्ष असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले










