
मालवण : मार्च २०२६ पासून निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कमर्शियल गॅस पुरवठ्यावरही स्पष्टपणे जाणवू लागला होता. विशेषतः १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा अत्यंत मर्यादित झाल्याने स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. हॉटेल, खानावळी, खाद्य व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक उपक्रमांवर याचा थेट परिणाम झाला होता. अपुऱ्या पुरवठ्या बाबत आमदार निलेश राणे यांनी भारत गॅस आणि इण्डेन कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने व्यवसायिक सिलेंडरचा वाढीव पुरवठा उपलब्ध झाला. त्यामुळे व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.
भारत गॅस आणि इण्डेन गॅसचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत होता. एक-दोन दिवसांच्या अंतराने केवळ १२ किंवा २४ सिलिंडर एवढाच साठा उपलब्ध होत असल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली होती. परिणामी अनेक व्यावसायिकांना आपले कामकाज अर्धवट ठेवावे लागत होते, तर काहींना पर्यायी उपायांचा अवलंब करावा लागत होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी संबंधित गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत पुरवठा कमी होण्यामागील कारणांची चौकशी केली. त्यांच्या ठोस आणि तत्पर हस्तक्षेपामुळे कंपन्यांनी परिस्थितीची तातडीने दखल घेतली. याचा सकारात्मक परिणाम म्हणून त्याच दिवशी १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा साठा वाढवून उपलब्ध करून देण्यात आला. अचानक वाढलेल्या या पुरवठ्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या व्यवसायाला पुन्हा गती मिळण्यास मदत झाली आहे.










