
मालवण : मालवण आडारी वाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम बोगस असून ठेकेदाराचे बिल देण्यात येऊ नये, तसेच रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी ह्युमन राईट्सचे निरीक्षक संदेश फाटक, विनोद वेंगुर्लेकर यांनी पंतप्रधान ग्रामसडकचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांच्याकडे केली आहे. मालवण आडारी वाडीतून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा रस्ता खैदा येथे जोडरस्त्याला मिळाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत बोगस झाले आहे. मातीतच डांबर घालण्याचे काम ठेकेदाराने केले आहे. याचा व्हिडीओ करत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर ठेकेदार आणि संबंधित विभागावर सोशल मीडियावर टिका करण्यात आली होती. फाटक यांनी या बोगस कामाबाबत अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले आहे. आज कुडाळ येथे पंतप्रधान ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपले याबाबत जाब विचारला. रस्त्याचे काम बोगस असून, काम करताना आपल्या विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी कामाच्या ठिकाणी नव्हता हे यातून स्पष्ट होत आहे. सदर रस्त्यावर पुन्हा एकदा खडीकरण, डांबरीकरण करावे. तसेच या कामाचे ठेकदाराचे बिल देण्यात येऊ अशी अशी मागणी फाटक यांनी केली आहे.










