सावंतवाडी पालिकेची उद्या 'वादळी' सभा

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 19:00 PM
views 72  views

सावंतवाडी : नगरपरिषदेची दुसरी मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २४ मार्च रोजी होत असून ही सभा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाने गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर शहराच्या विकासासाठी ४२ हून अधिक विकासकामांना मंजुरी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्धवट कामे आणि नियमांच्या उल्लंघनावरून काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नगरसेवक तौकीर शेख यांनी आज अर्धवट कामांचा आढावा घेतला. भटवाडी भागातील पाहणीदरम्यान त्यांनी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक ठिकाणी रस्ते अरुंद करून इमारतींचे बांधकाम केले जात आहे. मूळ साडेचार मीटरचा रस्ता असताना तो चार मीटरचा दाखवून उर्वरित जागेत बिल्डिंग मटेरियल टाकले जात आहे. अशा नियमबाह्य कामांवर तातडीने गुन्हे दाखल करा, असा इशारा शेख यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला. विशेष म्हणजे, या पाहणी दौऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर या देखील शेख यांच्यासोबत होत्या. त्यांच्यासमवेत पालिकेचे बांधकाम अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. अनेक ठिकाणी चुकीची कामे झाली असताना त्यांची बिले कशी काय अदा केली गेली ? असा सवाल करत शेख यांनी उद्याच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरण्याचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सर्वसाधारण सभेमध्ये ४२ हून अधिक विकासकामांना मंजुरी दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सुशोभीकरण आणि नागरी सुविधांच्या कामांचा समावेश असून यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे. एकीकडे सत्ताधारी गट ४२ कामांच्या माध्यमातून विकासाचा दावा करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष फिल्डवर होत असलेली 'नियमबाह्य बांधकामे' आणि 'अर्धवट कामांच्या बिलां'वरून विरोधकांनी घेराव घालण्याची तयारी केली आहे. यामुळे उद्याच्या सभेत विकासकामांच्या मंजुरीसोबतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची दाट शक्यता आहे.