
मालवण : मालवण हे एक प्रमुख पर्यटन शहर असल्याने येथे वर्षभरात लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात कचरा निर्मितीचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि शहराचे नैसर्गिक सौंदर्य व स्वच्छता टिकवण्यासाठी येथील नगरपरिषदेने आता बाजारपेठ आणि महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर रात्रीच्या वेळीही कचरा संकलन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. शहरातील काही महत्त्वाच्या भागांत आणि समुद्रकिनाऱ्यांवर उघड्यावर कचरा फेकला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यावर उपाय म्हणून मुख्य बाजारपेठ परिसर, फोवकांडा पिंपळ ते रॉक गार्डन रस्ता, चिवला समुद्रकिनारा परिसर भागात रात्रीची घंटागाडी सुरू करण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कचरा उघड्यावर फेकणे हा गुन्हा आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून विद्रुपीकरण होतेच, शिवाय नागरिक आणि प्राण्यांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपला कचरा उघड्यावर न टाकता केवळ नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी या मोहिमेबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, पर्यटन वाढीसाठी शहराची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही रात्रीच्या कचरा संकलनासोबतच दिवसाचे संकलनही नियमित सुरू ठेवणार आहोत. मालवणला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांचे योगदान मोलाचे असून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.










