
मालवण : तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुभाष लाड यांना कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांनी सरपंच तसेच सदस्य पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर करणे, कागदपत्रांचा गैरवापर आणि प्रशासकीय अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत महेश विठोबा जुवाटकर यांनी तक्रार केली होती.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सुनावणी दरम्यान ग्रामपंचायतीचा सन २०२४-२५ चा अधिकृत असेसमेंट उतारा (नमुना ८) रघुनाथ लक्ष्मण चेंदवणकर यांच्या नावे असताना १९ जानेवारी २०२३ रोजी सरपंच यांनी आपल्या पदाचा शिक्का आणि ग्रामपंचायतीच्या सीलचा वापर करून असाच उतारा समद किताबुल्ला चौधरी यांच्या नावे दिल्याचे दिसून आले. नियमानुसार असेसमेंट उतारा देण्याचे अधिकार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असताना सरपंचांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित इसमाने म्हणजेच समद चौधरी याने कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सरपंचांच्या लक्षात येऊनही त्यांनी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल केली नाही. ही बाब संशयास्पद मानली गेली. विभागीय आयुक्तांनी आपल्या निष्कर्षात नमूद केले की, सरपंच सुभाष लाड यांनी कामकाजात गैरवर्तणूक, हलगर्जीपणा आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैध नागरिकत्व व इतर प्रशासकीय लाभ मिळवून देण्याचा गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे.
या सर्व बाबींचा विचार करता कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून सुभाष लाड यांना सरपंच आणि सदस्य पदावरून तात्काळ प्रभावाने निष्कासित करण्याचे आदेश पारित केले आहेत.










