
मालवण : मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका अन्वेषा अजित आचरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या आदेशाने मालवण नगरपालिकेमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवक मंदार केणी, दर्शना कासवकर, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, आणि ललित चव्हाण यांनी एकत्र येत मालवण शहर विकास समिती या नावाचा अधिकृत गट स्थापन केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करण्याबाबतचा ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त सादर करण्यात आले आहे.
मालवण शहर विकास समितीच्या गटनेते पदी सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मालवण नगरपालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येत हा गट स्थापन केला असून यामध्ये नगरसेवक मंदार केणी, सौ. दर्शना कासवकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. महानंदा खानोलकर, ललित चव्हाण यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व संबंधित नियमानुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.










