
दोडामार्ग : दोडामार्ग ते वीजघर रस्त्याचे काम सध्या अतिशय बेकायदेशीर, व चुकीच्या आणि जनतेला अंधारात ठेवून सुरू आहे. विकासाला आमचा कधीही विरोध नाही मात्र बेकायदेशीर पद्धतीने, लोकांचा विश्वास न घेता आणि जीव धोक्यात घालून विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कायम विरोध करत राहील, असा ठाम इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी दिला. तसेच जनतेला विश्वासात घेऊन, कायदेशीर व योग्य पद्धतीने हे काम न केल्यास येत्या २६ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असेही गवस यांनी स्पष्ट केले.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गवस म्हणाले की, या रस्त्याच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेता जबाबदारी झटकली आहे. बांधकाम विभागानेही हा रस्ता आमच्याकडे नसल्याचे सांगून तो रस्ते विकास मंडळाकडे असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच एकही यंत्रणा जबाबदारी घ्यायला तयार नाही, आणि अशा परिस्थितीत ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे.
अपघात झाल्यास शिवसेना जबाबदारी घेईल का ?
या रस्त्याच्या संदर्भात तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन रस्त्याच्या कामाला कोणीही विरोध करू नये असे सांगितले होते. तसेच विरोधकांवर अनेक आरोप देखील केले होते. यावर आज उत्तर देताना रविकिरण गावस म्हणाले की, या रस्त्याचे आजतागायत भूमिपूजनही झालेले नाही. तसेच ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात प्रवासासाठी रस्ता उपलब्ध करून दिला नाही आहे. हा रस्ता अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत जर कोणताही अपघात झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पदाधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी घ्यावी, असा थेट इशारा गवस यांनी दिला.
शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघड
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या रस्त्याच्या कामाला विरोध करू नये, असे सांगितले. मात्र आम्ही रस्त्याला नाही, तर चुकीच्या आणि बेकायदेशीर कामाला विरोध करत आहोत, हे त्यांनी स्पष्ट केले. जनतेला अंधारात ठेवून, स्थानिक लोकांना प्रचंड त्रास देत हे काम सुरू आहे, हे शिवसेना जाणूनबुजून दुर्लक्षित करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
ते वक्तव्य आणि आजची भूमिका यामध्ये संशय गडद...
२९ नोव्हेंबर रोजी रस्त्याचे काम सुरू असताना स्वतः शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी तिलारी येथे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे मान्य केले होते. तसेच अशा कामाला आपणही विरोध करू, असे तेव्हा त्यांनी आपणाला सांगितले होते. मात्र आज तेच निंबाळकर पत्रकार परिषद घेऊन पूर्णपणे उलटी भूमिका घेत आहेत. आता निंबाळकर यांनी ठेकेदाराकडून काम घेतले असल्यामुळेच त्यांची भूमिका बदलली आहे. ठेकेदाराचे मजूर उघडपणे सांगतात की आमचे ऑफिस राजेंद्र निंबाळकर यांच्या घरी आहे. प्रत्येक वेळी त्यांचेच नाव पुढे येत असल्याने ठेकेदार आणि राजेंद्र निंबाळकर यांच्यामध्ये साटेलोटे आहेत का? असा गंभीर प्रश्न गवस यांनी उपस्थित केला आहे.
आमदार दीपक केसरकरांवरही घणाघाती टीका...
या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांनीही केलेले नाही. केसरकर यांना फक्त मतांसाठी दोडामार्ग तालुका हवा आहे मात्र तालुक्यातील लोकांना विश्वासात न घेता कामे करून घेणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी टीकाही गवस यांनी केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच असून, यामागे त्यांचा आणि त्यांच्या आमदारांचा काहीतरी स्वार्थ आहे, असा आरोपही गवस यांनी केला.
हत्ती प्रश्नावरही आरोपांची झोड
शिंदे शिवसेनेने हत्तीमुक्त तालुका अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास आपणच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार, अशी विधाने ही केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे, असे गवस म्हणाले. दीपक केसरकर गेली वीस वर्षे हत्ती शोधत आहेत का ? की हत्ती प्रश्नावर वीस वर्षे अभ्यासच करत आहेत ? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हत्ती प्रश्न पुढे करून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघातही त्यांनी केला.










