
वैभववाडी : आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार(ता.३)जानेवारी होत आहे. यानिमित्ताने मंदीरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात तयारीला वेग आला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव संपन्न होतो.यावर्षीचा हा जत्रोत्सवाचा सोहळा शनिवारी (३जाने.)होत आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ७ वाजता महापूजा व महाआरती होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, तर दुपारी १.३० वाजता ओटी भरणे कार्यक्रम सुरू होणार आहे.
दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम व द्वितीय क्रमांकास पैठणी व चषक दिले जाणार आहेत.तसेच अंतिम फेरीतील दहा स्पर्धकांना आकर्षक साड्या देण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत मुंबई येथील गायक सुनिल वाडकर यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रु. ११,१००, द्वितीय क्रमांकास रु. ७,१०० व तृतीय क्रमांकास रु. ५,१०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी दोन हजार रुपयांची तीन बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते रात्री १०.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. रात्री ११ वाजता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर रात्री १२ वाजता दशावतारी नाटक सादर होणार आहे.भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व ग्रामपंचायत आचिर्णे यांनी केले आहे.










