
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या माध्यमातून तीन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे पर्यटक व ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन हे उपक्रम राबविण्यात आला आहे. कुणकेश्वर देवालय परिसरात उभारण्यात आलेल्या RO वॉटर प्लांटचे लोकार्पण कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते करण्यात आले. या वॉटर प्लांटमधून १ रुपये प्रति लिटर दराने शुद्ध, स्वच्छ व थंड पाणी ग्रामस्थ व पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
तर कुणकेश्वर भक्तनिवास येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत घाडी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, EV चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या चार्जिंग स्टेशनमुळे दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार असून,पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पर्यटकांची दिवसेंदिवा वाढती संख्या आणि गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेले हे तीनही प्रकल्प स्वच्छता,पर्यावरण संरक्षण आणि मूलभूत सुविधा यासाठी उपयुक्त ठरणार असून, कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
या कार्यक्रम सोहळ्यास ग्रामपंचायत कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील,देवस्थान ट्रस्टचे पेडणेकर, रामदास तेजम, ट्रस्टी श्रीकृष्ण बोंडाळे, ग्रामपंचायत कर्मचारी ऋषिकेश चव्हाण, राजेंद्र तेली, मंगेश मेस्त्री, अमित सावंत,प्रियांका चव्हाण, दीपश्री दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक या लोकार्पण सोहळ्या निमित्त उपस्थित होते.










