
मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील बाजारपेठेतून अनधिकृत स्टॉल हटवण्यासाठी आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आज संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उद्यापासून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत व्यापारी आणि नागरिकांनी अनेक सूचना केल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि पालिका कर्मचाऱ्यांनी आज भरड भागापासून संपूर्ण बाजारपेठेची पाहणी केली. यामध्ये रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, अनधिकृत दुकाने आणि चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली दुचाकी व चारचाकी वाहने यांची तपासणी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात खरेदीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी, व्यावसायिक आणि वाहनचालकांना योग्य ठिकाणी वाहने पार्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेने निश्चित केलेल्या बंदरजेटी आणि मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात वाहने उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याव्यतिरिक्त, गणेशोत्सव काळात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहने आणि चारचाकी वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर उद्यापासून कठोर कारवाई केली जाईल. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई केली जाईल, तर चुकीच्या पार्किंगसाठी पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करेल.