मालवण तालुका चालक मालक संघटनेचा 'त्या' आंदोलनाला पाठींबा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 09, 2024 19:26 PM
views 336  views

मालवण : वाहन अपघातात संबंधित ड्रायव्हरला १० वर्षाची शिक्षा व ७ लाख रुपये दंड अशा स्वरुपाच्या मंजूर झालेल्या कायद्यातील तरतुदी वाहन चालकांवर अन्याय कारक असल्याने शांततेच्या मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जानेवारी रात्री १२.०० वाजल्यापासून स्टेअरींग छोडो आंदोलन सर्वत्र केले जाणार आहे. याला मालवण तालुका चालक मालक संघटना यांचा पाठिंबा राहणार आहे. याबाबतचे निवेदन पत्र मालवण तालुक्यातही तहसीलदार वर्षा झालटे यांना देण्यात आले. यावेळी मालवण तालुक्यातील चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास संबंधित वाहन चालकाच्या विरोधात १० वर्ष शिक्षा व ७ लाख पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. वास्तविक वाहन अपघात हा संबंधित चालक हा जाणून-बुजून करत नसून त्या-त्या वेळेची विशिष्ट परिस्थिती, खराब रस्ते, वळणाचे रस्ते किंवा संबंधित पादचाऱ्याच्या अचानक रस्ता ओलांडण्याच्या कृत्यामुळे देखील अपघात होत असतात. ही विशिष्ट परिस्थिती विचारात न घेता अपघातग्रस्त वाहन चालकाच्या विरोधात १० वर्षाची शिक्षा व ७ लाख दंड झाल्यास संबंधित ड्रायव्हरच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन संपूर्ण कुटुंब उ‌द्ध्वस्त होणार आहे.

वाहन चालक हे गरीब कुटुंबातील असतात व त्यांच्या पगारावरती पण मर्यादा आहेत. अश्या परिस्थिती नव्या कायद्या बाबत संशोधन गरजेचे आहे. आमच्या संघटनेतर्फे आम्ही शांततेच्या मार्गाने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जानेवारी रात्री १२.०० वाजल्यापासून स्टेअरींग छोडो आंदोलन सर्वत्र करीत आहोत. तरी सदर आंदोलनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती आहे. याबाबत निवेदन पत्र मालवण तालुका चालक, मालक संघटना यांच्या वतीने मालवण तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तसेच निवेदनातील भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहेत. यावेळी मोठ्या संख्येने चालक, मालक उपस्थित होते.