मालवण बंदराचा विकास करणार

पालकमंत्र्यांचा आढावा बैठकीत शब्द
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 10, 2025 17:17 PM
views 66  views

सिंधुदुर्गनगरी :  आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ व टर्मिनल बिल्डींग बांधलेली आहे. या परिसरातील शासकीय जागेतील वाहनतळामध्ये उभारलेल्या स्टॉल धारकांना याच परिसरात स्टॉल उभारुन देण्यात येतील कोणीही विस्थापित होणार नाही. या परिसराचे सुशोभिकरण करताना  मरीना प्रकल्प विकसित करणार असून मालवण बंदाराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसकरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगळे, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, श्री वराडकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियोजनाप्रमाणे स्टॉल धारकांना स्टॉल उभारुन देण्यात येणार आहेत.  कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.  मालवण मध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. राजकोट परिसरात शिवसृष्टी देखील उभारण्यात येणार असल्याने मालवण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरणार आहे. मालवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आराखडा बनवावा. मालवणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले. बैठकीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधला.