मालवण पंचायत समिती 'या' पुरस्काराची ठरली मानकरी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 12, 2023 20:01 PM
views 63  views

मालवण : यशवंत पंचायतराज अभियान सन २०२२-२३ अंर्तगत राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती याचे विभाग व राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात कोकण विभाग स्तरावर मालवण पंचायत समिती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. 

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायतराज संस्थांच्या  माध्यमातून राबविल्या जातात. पंचायतराज संस्थाना त्यांनी केलेल्या कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती साठी २००५ - ०६ या आर्थिक वर्षांपासून विभाग स्तर व राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार सन २०२२ - २३ यावर्षासाठीचे पुरस्कार ग्रामविकास विभागाच्या वतीने १२ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत. कोकण विभागात द्वितीय क्रमांक ठरलेल्या मालवण पंचायत समितीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे सामान्य विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व खाते प्रमुख, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले अशी माहिती गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी दिली.