केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड पुस्तकांचे गाव

साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम १० लाख : मंत्री उदय सामंत यांची घोषणा
Edited by:
Published on: April 20, 2025 19:25 PM
views 121  views

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी रविवारी केली महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मालगुंड ग्रामपंचायतीत प्रथम पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच स्वेता खेऊर आदी उपस्थित होते.

यापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटींची तरतूद केलेली आहे, असे सांगून डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेत ताकद आहे. मराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहे. जोपर्यंत साहित्यिक नाटक लिहीत नाही तोपर्यंत नाटक रंगमंचावर येत नाही. आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया हा आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात पद्मश्री श्री. कर्णिक म्हणाले, कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. एका हातात भाकरी असेल तर ती भाकरी आपल्याला जगवेल. दुसऱ्या हातात पुस्तक असेल तर का जगावं हे ते पुस्तक सांगेल. संचालक डॉ. देवरे यांनी पुस्तकांच्या गाव या मागील शासनाची भूमिका सांगितली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अरुण म्हात्रे यांनी शिपाई कविता सादर केली. विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी स्वागत प्रास्तविक केले. कार्यक्रमास जयु भाटकर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, सुनिल मयेकर, नलिनी खेर आदींसह साहित्यिक, ग्रामस्थ उपस्थित होते.