नादुरूस्त झालेला 'अग्निशामक' युवासेनेच्या इशाऱ्यानंतर तात्काळ दुरुस्तीने सेवा देण्यास कार्यरत : उमेश येरम

Edited by: दिपेश परब
Published on: April 10, 2024 06:56 AM
views 94  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचा नादुरूस्त झालेला अग्निशामक त्वरीत काम करून सेवेत सुरू करा अन्यथा नगरपरीषदेसमोर आंदोलन छेडण्याच्या इशारा वेंगुर्ले युवासेनेच्या वतीने युवासेना शहरप्रमुख संतोष परब यांनी दिला होता. यानंतर प्रशासनाने याची दखल घेत अग्निशामकाची दुरस्ती तात्काळ करून घेत तो सेवेत दाखल केला आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, नादुरूस्तीचे काम करुन सेवेसाठी तत्पर केलेला अग्निशामक पुन्हा केव्हाही नादुरूस्त होऊन सेवेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे नागरीकांना अत्यावश्यक सेवेसाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा या भागाचे आमदार दिपक केसरकर यांच्याकडे नवीन अग्निशामक देण्याची मागणी शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी केली आहे.

वेंगुर्ला नगरपरीषदेच्या अग्निशामक बंब हा अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. वेंगुर्ला नगरपरीषदेचा बंब हा नेहमीप्रमाणे अनेकांची मोठी नुकसानी टाळण्यासाठी यशस्वी भूमिका निभावली आहे. परंतु गेल्या कांही दिवसांत तो नादुरस्त होऊन जागीच राहिल्याने शहरालगतच्या उभादांडा बागायतबीच येथील गोलवन हॉटेलचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडतात त्यावेळी होणारी नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक सेवा हि महत्वाची ठरते. 

मंत्री दिपक केसरकर यांनी नगराच्या विकासासाठी आचार संहितेपुर्वी दिलेल्या निधीची कामे तात्काळ व्हावीत यासाठी नगरपरीषद प्रशासनाने आपली तत्परता दाखवून ती आचार संहिता लगण्यापुर्वी करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. मात्र तत्परतेने ती प्रकिया न केल्याने आचार संहितेत अनेक कामे अडकून पडल्याची खंत यावेळी श्री येरम यांनी व्यक्त केली.

वेंगुर्ला नगरपरीषद मार्केटच्या भागांत पार्कीगसाठी जागा मच्छिमार्केट नजीक उपलब्द आहे. मात्र त्या पार्कीग ठिकाणी जाण्यायेण्याकरीता नगरपरीषद प्रशासनाने व्यवस्था करावी यासाठी वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मार्केट समोरील रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे. यातही प्रशासनाची तत्परता कमी पडलेली दिसून येत आहे.

लाखो रूपये खर्चुन शहरातील घोडेबांव गार्डन मध्ये विविध स्वरूपात कामें करण्यात आलेली आहेत. पण त्यातील प्रमुख आकर्षण असणारा कारंजा बंद पडलेला आहे. या भागात लावलेली झाडे व लॉन यांना पाणी न दिले गेल्याने ती वाळत आहेत या गार्डनला दोन गेट असून सुध्दा एक गेट बंद ठेवून नागरीकांची गैरसोय केली जात आहे. याबाबत सुचना करूनही याकडे नगरपरीषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

 नगरपरीषद प्रशासनामार्फत शहरात सुरू असलेली कामेहि विहित वेळेत पुर्ण होण्यासाठी जो लक्ष प्रशासनाकडून ठेवायचा असतो त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे रामेश्वर देवस्थान शुशोभिकरणाचे काम होय. हे काम काही दिवसापूर्वी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद पडले होते याची माहिती मिळताच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी नगरपरिषद प्रशासन, ठेकेदार, रामेश्वर देवस्थानचे विश्वस्त यांची एकत्रित मिटिंग घेऊन सदरचे काम बंद होण्याचे कारण विचारून घेत ते काम तुम्ही सर्वांनी लक्ष घालून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात काही अडचणी आल्या तर आपण सोडविण्याचेही श्री. वालावलकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ते काम सुरू झाले. या प्रमाणेच शहरात सुरू असलेली विकास कामे हि लवकर पुर्ण होऊन नागरीकांच्या सेवेसाठी कार्यान्वित होतील अशा स्वरूपात नगरपरीषद प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरीकांनी नगरपरीषद प्रशासनाकडे सोई सुविधा बाबत मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांत नगरपरिषदेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. असेही उमेश येरम यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.