
मालवण : मालवणात शिवसेना भाजपा युती तुटली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील ठरले आहेत. शिवसेनेकडून माजी नगरसेविका ममता वराडकर तर भाजपाकडून शिल्पा यतीन खोत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. दोन्ही उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने दोन्ही पक्षाकडून उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
मालवण नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. आता पर्यंत नगरसेवक पदाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत होते. नगराध्यक्ष पदाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी सस्पेन्स ठेवला होता. त्यात युती होणार की स्वबळावर लढणार याबाबत युतीत घमासान सुरु होते. अखेर युती तुटल्याची अधिकृत घोषणा कोणी केली नसली तरी दोन्ही पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे युती तुटली असून शिवसेना भाजपा स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले आहे. आज आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेकडून ममता वराडकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत एबी फॉर्म दिला. शिवाय सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उद्या रविवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केले. त्यानंतर काहीच वेळात भाजपनेही नराध्यक्ष पदासाठी शिल्पा यतीन खोत यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. शिवाय सर्व नगरसेवक् उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर युतीतील दोन्ही घटकपक्ष नगरपरिषद निवडणुकीत आमने सामने येणार आहेत. शिवसेनेकडून आमदार निलेश राणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपचेही नेते उद्या मालवणात दाखल होणार आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडी कडून अद्याप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. महाविकास आघाडीतही पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी धक्कातंत्र अवलंबण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या नावाची घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.










