
सावंतवाडी : तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच पदांच्या पोट निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असून माजगाव थेट सरपंच पदासाठी आतापर्यंत ४ जणांनी अर्ज दाखल केलेत. भाजपकडून श्रद्धा मुकुंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजगाव येथील थेट सरपंचांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक लागली असून आतापर्यंत ४ जणांनी थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप महायुतीकडून श्रद्धा मुकुंद सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, संजय कानसे, मधूकर देसाई आदी उपस्थित होते. माजगावसह नाणोस सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. तर नाणोस, किनळे, कारिवडे, कास, शेर्ले, निगुडे, रोणापाल, कवठणी, विलवडे, कुडतरकरटेंब ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.










