
सावंतवाडी : ओटवणे गावचे दुसऱ्यांदा सरपंचपद भूषविताना आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी गावच्या विकासासह धार्मिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे गेल्या सात दशकात ओटवणे गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी केले.
ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, गुरु मळेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, समीक्षा गावकर, दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, कांता मेस्त्री, नाना गावकर, ओटवणे सोसायटी उपाध्यक्ष स्वप्निल उपरकर, सदस्य प्रदीप दळवी, सचिव अश्विनी तावडे, कवी रामदास पारकर, गुंडू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दाजी गावकर यांनी आपण गावाच्या हितासाठी काम करत असताना रवळनाथाच्या कृपाशीवादासह आबाल वृद्धांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या पाठबळामुळेच आपल्या हातून समाजकार्य घडले. यात आपण समाधानी असून ओटवणे वासियांचे आभार मानत यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी दाजी गावकर यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ओटवणे गावातील सुभाष गावकर, भगवान तावडे, अमोल गावकर, गुरु बुराण, दशरथ शृंगारे, सुनिल मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, शांताराम श्रृंगारे, अंकुश वारंग, बाळा कर्पे, जादूगार वैभव कुमार पारकर, राजन गावकर, प्रमोद गावकर, भिकाजी बिले, लूमा जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश चव्हाण यांनी तर आभार जयगणेश गावकर यांनी मानले.










