पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहक संघटना - व्यापारी महासंघ कणकवलीने वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2025 13:45 PM
views 37  views

सावंतवाडी: वीज ग्राहक संघटना कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांसह व्यापारी महासंघ कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या विजेच्या समस्या लक्षात घेता पावसाळ्या पूर्वीच योग्य ती खबरदारी घेऊन पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माळी यांच्याकडे केली. 


यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, कणकवली व्यापारी महासंघ तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, उपकार्यकारी अभियंता वैभववाडी कुमार चव्हाण, मालवण श्री. म्हेत्रे, श्री. बगाडे, कणकवली, श्री. निमकर, देवगड तथा आचरा विभाग प्रभारी आदी उपस्थित होते. कोकणात पावसाळा सुरू झाला की विजेचा लपंडाव सुरू होतो.

काही गावांमध्ये तर चार चार दिवस विजेचा पत्ताच नसतो आणि याचे कारण म्हणजे कमकुवत असलेले इन्फ्रास्ट्रक्टर, महावितरणकडे कंत्राटदारांची खाजगी यंत्रणा असूनही झाडे छाटणी योग्य पद्धतीने केली जात नाही, जंगलातून जाणारी लाइन साफसफाई न करणे, कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, अपुरा अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांची मानसिकता. परंतु यामुळे वीज ग्राहकांना भरमसाठ बिले भरूनही अखंडित वीज पुरवठ्याचा त्रास होतोच उलट वादळी पावसात झालेले नुकसान देखील वीज अधिभार आदींच्या स्वरूपात ग्राहकांच्याच माथी मारले जाते. त्याचबरोबर वीज ग्राहकांना दिली जाणारी अतिरिक्त सुरक्षा ठेव बिले, वारंवार खंडित होणारी वीज यामुळे व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान, प्रीपेड मीटर, वाढीव बिले असे अनेक विषय घेऊन कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता कणकवली विभाग श्री.माळी यांची भेट घेऊन वरील सर्व अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली.

यावेळी चारही तालुक्यातील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते. वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा नक्कीच योग्य विचार करून पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता श्री माळी यांनी दिली. यावेळी सुनील जाधव, उत्तम गावकर, संतोष नाईक, प्रकाश पावसकर, संजय वालावलकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.