
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याचा धोका वाढला असून, त्यातून अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ आणि गॅस्ट्रोएन्टरायटिस यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित पाण्याचाच वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पावसाळ्यात विहिरी, बोअरवेल, नळपाणी योजना आणि इतर जलस्रोतांमध्ये बाहेरील दूषित पाणी मिसळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पिण्याचे पाणी शक्यतो १० ते १५ मिनिटे उकळून वापरावे किंवा द्रवरूप क्लोरीन (मेडिक्लोर) अथवा क्लोरीन गोळ्यांच्या साहाय्याने निर्जंतुक करूनच पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
घरातील पाणी साठविण्याची भांडी, टाक्या आणि ड्रम नियमित स्वच्छ करून झाकून ठेवावेत. पाणी काढताना स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा आणि हात थेट पाण्यात बुडवू नयेत. तसेच पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्यास, रंग बदलल्यास किंवा पाणी गढूळ दिसत असल्यास ते पाणी वापरणे टाळावे. आवश्यक असल्यास पाणी गाळून वापरावे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय गावातील विहिरी, नळपाणी योजना आणि इतर जलस्रोतांच्या परिसरात स्वच्छता राखणे, सांडपाणी व कचरा साचू न देणे, जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुणे, उघड्यावर विक्री होणारे अन्नपदार्थ टाळणे आणि शक्य असल्यास दर्जेदार वॉटर प्युरीफायरचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. अतिसार, उलट्या, ताप, पोटदुखी किंवा कावीळ यांसारखी लक्षणे आढळल्यास स्वउपचार न करता त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
जलजन्य आजारांपासून बचावासाठी...
सुरक्षित स्रोताचे पाणीच प्या.
पाणी १० ते १५ मिनिटे उकळून वापरा.
क्लोरीन गोळ्या किंवा द्रवरूप क्लोरीनचा योग्य प्रमाणात वापर करा.
पाणी साठविण्याची भांडी स्वच्छ व झाकून ठेवा.
जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुवा.
उघड्यावर विक्री होणारे अन्न व दूषित पाणी टाळा.
शक्य असल्यास दर्जेदार वॉटर प्युरीफायरचा वापर करा.
"स्वच्छ पाणी – निरोगी जीवनाची हमी" हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून पावसाळ्यात सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.










