मानवी जीवन कौशल्य - आस्थापनातील व्यवस्थापकीय कौशल्य यांचा समतोल राखावा : डॉ. अमित मेढेकर

'नागरी सेवांमधील करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन
Edited by:
Published on: January 30, 2025 15:48 PM
views 67  views

गुहागर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाद्वारे १७ जानेवारी २०२५ रोजी ‘नागरी सेवांमधील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर पार पडले. या शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून ब्रॉडवे एज्युकेशन हब, पुणे चे विभागीय प्रमुख डॉ.अमित मेढेकर हे उपस्थित होते.

या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य व शहाणपण या तीन महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच दैनंदिन व्यवहारातील काही उदाहरणे देऊन त्यांनी अभ्यासात कशाप्रकारे सातत्य राखले पाहिजे यावर सविस्तर विवेचन केले. नागरी सेवेतील परीक्षांचा विचार करताना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत हे टप्पे किती महत्त्वाचे आहेत, तसेच नागरी सेवांमधील करिअर संधीचा विचार करताना त्यामध्ये विविध एकूण २४ शाखांचा अभ्यास करता येतो यावर त्यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्याचप्रमाणे दैनंदिन मानवी जीवनात मानवी स्कील व व्यवस्थापकीय स्कील किती महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक विद्यालय, पालशेत तसेच न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वेळणेश्वर मधील विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.हृषिकेश भावे यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्रकुमार सोनी, उपप्राचार्य प्रा. अविनाश पवार, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. जितेंद्र आचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.