‘माई इन्स्टिट्यूट’मुळे ‘हॉटेल मॅनेजमेंट’ क्षेत्रात जगभरात संधी !

लोकमान्य ट्रस्टचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर यांचे प्रतिपादन
Edited by: संदीप देसाई
Published on: August 05, 2024 16:26 PM
views 103  views

  •  'माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट'चा ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे शानदार उद्‍घाटन

सावंतवाडी : कोकणातील माणसे नारळाच्या पाण्याप्रमाणे गोड आहेत. कोकणावरील प्रेम आणि मालवणचा नातू या नात्याने या भागाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो. 'माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट'च्या विविध कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगभरात संधीची दारे खुली होतील. हॉटेल व्यवसायात प्रचंड पैसा आहे. डोळे दीपतील अशा ठिकाणी तुम्ही काम करू शकाल, असे प्रतिपादन लोकमान्य ट्रस्टचे चेअरमन आणि जेष्ठ संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी मळगाव-सावंतवाडी येथे केले. लोकमान्य एज्युकेशन ट्रस्ट संचलित माई इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या २०२४-२५ वर्षाच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.



संस्थेच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका सई ठाकूर-बिजलानी, 'तरुण भारत'च्या संचालिका रोमा ठाकूर, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी  श्रद्धाराजे भोसले, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब, लोकमान्य ट्रस्टचे संचालक अनंत उचगावकर, गोवा येथील हॉटेल ग्रँड हयातचे लर्निंग मॅनेजर आणि हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनचे लर्निंग स्पेशालिस्ट प्रसाद पी. प्रभू, लोकमान्य सोसायटीचे शिक्षण समन्वयक डॉ. दत्तात्रय मिसाळे, माई इन्स्टिट्युटचे प्राचार्य अनिरुद्ध दास, जेष्ठ पत्रकार शेखर सामंत, 'लोकमान्य एज्युकेशन'चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, मळगाव प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर उपस्थित होते. सध्याच्या काळात व्यावसायिक शिक्षणाला महत्व आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच जॉब हवा असतो. त्यादृष्टीने येथेही कॅम्पस इंटरव्हयूव्हच्या माध्यमातून जॉब मिळतील. या व्यवसायात खूप मेहनत आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे कठोर मेहनत घेऊन शिक्षण घ्यावे. त्यासाठी आवश्यक गेस्ट लेक्चरर्स, शेफ मुंबई आणि गोवा येथून उपलब्ध करण्यात येतील. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये जॉब मिळेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.




व्यावसायिक शिक्षण काळाची गरज !

ते पुढे म्हणाले, आता बी. ए., बी. कॉम. या पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गरजेच्या शिक्षणावर आता भर देण्यात येणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. बॅ. नाथ पै यांच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ २०० एकर जागेत सुरू केले जाणार आहे. तेथे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाईल. कोकणावर आमचे प्रेम आहे. त्यामुळे या भागातील लोकांना भविष्यात अधिकाधिक शैक्षणिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

ज्ञानदान हेच पवित्र काम

ज्ञानदानासारखे पवित्र काम कुठलेही नाही. त्यामुळे ज्ञानदानाच्या क्षेत्रात मी माझ्या वडिलांचा वारसा घेऊन उतरलो आहे. माझे आजोबा देशभक्त शंकरराव गवाणकर यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी मालवणचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या नावाने सावंतवाडीत बीएमएस कॉलेज सुरू केले. तर साळगाव येथे हॉटेल मॅनेजमेंट, बी. एड. कॉलेजही सुरू करण्यात आले आहे. येथे शिक्षण घेऊन विद्यार्थी भविष्य घडवत आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता जगभरात मागणी आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्या मिळतील. ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.


शैक्षणिक वारसा जपला !

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझ्या वडिलांनी भाग घेतला. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड होती. त्यामुळे त्यांनी बेळगाव येथे टिचर्स ट्रेनिंग शिक्षण सुरू केले. त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षक झाले. सावंतवाडीत बंद पडलेले राणी पार्वतीदेवी हायस्कूल माझ्या वडिलांनी बेळगाव येथे सुरू केले. हा वारसा मी पुढे सुरू ठेवला आहे. माझी आई माई ठाकूर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला होता. तिला स्वयंपाकाची आवड होती. तिच्या नावाने हे कॉलेज सुरू करण्यात आले आहे. माझी पत्नी रोमा ठाकूर यांनीच हे कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, असेही ठाकूर म्हणाले.

सिंधुदुर्गच्या विकासात आमचाही वाटा आहे. या भागात पहिले रिसॉर्ट 'वाईल्डर नेस्ट' आम्ही सुरू केले. त्याशिवाय बेळगाव, गोवा भागात रिसॉर्ट सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रचंड वाव : युवराज लखम सावंत भोसले

   हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आव्हाने असली तरी शिकण्यासारखे खूप आहे. मला या क्षेत्राची आवड आहे. तुम्ही राजघराण्यातले आहात, मग या क्षेत्रात कशाला, असे अनेकांनी विचारले. मी मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचेही काम आणि नाईट ड्युटी केल्याचेही अनुभव यावेळी कथन केले.  तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता तेव्हा त्यातील बारकावे लक्षात घ्यायला हवेत. हॉटेलिंग क्षेत्रात भरपूर वाव आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे आपण वळले पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे लखम सावंत-भोसले यांनी केले. 

पर्यटकांना सर्वोत्तम सेवा हेच यशाचे गमक

श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, कोकणी माणसाच्या रक्तातच आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. येथील लोक प्रेमळ आहेत. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योगाला येथे वाव आहे. त्यामुळेच आम्ही सावंतवाडी पॅलेस ब्युटिक हॉटेल सुरू केले. आम्ही जपानी, कोरियन फूडही देतो. या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. तुम्ही पर्यटकांना सर्वोत्तम असे द्या. मग ते तुम्हाला कधीही विसरणार नाहीत.

हे तर सिंधुदुर्गवासियांचे भाग्‍यच !

गोवा येथील हॉटेल ग्रँड हयातचे लर्निंग मॅनेजर आणि हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनचे लर्निंग स्पेशालिस्ट प्रसाद पी. प्रभू म्हणाले, अशी इन्स्टिट्युट सिंधुदुर्गात सुरू होतेय, हे तुमचे भाग्य आहे. येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. तुम्ही भविष्यात वाटचाल करत असतांना अॅटिट्युड, स्किल आणि नॉलेज या तीन गोष्टी लक्षात ठेवा. देवाने आपल्याला दोन कान, दोन डोळे आणि एक तोंड दिले आहे. त्यामुळे तुम्ही अधिक ऐकले पाहिजे. पाहिले पाहिजे. काम करण्याची इच्छा महत्वाची आहे. लोकांशी बोलण्याची कला शिकली पाहिजे.


उत्तम दर्जा राखू : सई ठाकूर

लोकमान्य ट्रस्टच्या संचालिका सई ठाकूर-बिजलानी म्हणाल्या, आज प्रत्येकाला ग्लॅमरस जॉबची अपेक्षा असते. त्या दृष्टीने हॉस्पिटॅलिटी हे उत्तम क्षेत्र आहे. येथे अमर्याद संधी आहेत. कारण खाणे ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. मात्र, या क्षेत्राची आवड आणि समर्पणाची भावना हवी. आम्ही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊ. येथील अनुभव तुमच्यासाठी अमूल्य असतील. आणि आम्ही दर्जाही उत्तम राखू, येथील सर्व मार्गदर्शक हे अनुभवी आहेत.

आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. कारण देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत रोजगाराची अमर्याद संधी आहे आणि ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते, असेही ठाकूर म्हणाल्या.

उपस्थितांचे स्वागत डॉ. किरण ठाकूर, प्रवीण प्रभू-केळुसकर, प्राचार्य अनिरुद्ध दास यांनी केले. ओळख लोकमान्यचे शिक्षण समन्वयक डॉ. दत्तात्रय मिसाळे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या ॲडमिस्ट्रेशन असिस्टंट आदिती राणे यांनी केले. तर आभार प्राचार्य दास यांनी मानले.